belgaum

मास्टर प्लॅन तात्काळ सुरू करा, अन्यथा बुडा बरखास्त करा –

0
280
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहराचा नियोजित मास्टर प्लॅन युद्धपातळीवर राबवावा. जर मास्टर प्लॅन राबवता येत नसेल तर बुडा अर्थात बेळगाव शहर विकास प्राधिकरण बरखास्त करून त्याला नगर रचना खात्यामध्ये जोडून टाकावे, अशी मागणी आम आदमी पक्षाचे बेळगाव जिल्हा अध्यक्ष अध्यक्ष विजय पाटील यांनी केली आहे.

आम आदमी पक्षातर्फे (आप) शहरातील कन्नड साहित्य भवन येथे आज सोमवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. विजय पाटील म्हणाले की, बेळगाव शहर विकास प्राधिकरणाने गेल्या 15 वर्षात कोणतेही नवे लेआउट केलेले नाही आणि जे केले आहेत ते देखील चुकीचे आहेत. गेल्या अडीच वर्षापासून आसपासच्या 28 गावांना समाविष्ट करून बेळगाव शहराचा नवा मास्टर प्लॅन तयार करण्याचा गाजावाजा केला जात आहे. मात्र प्रत्यक्षात आजपर्यंत संबंधित कोणत्याही गावांमध्ये लेआउटची प्रक्रिया झालेली नाही.

मास्टर प्लॅन तयार करून तो अधिसूचित करण्यात बुडा पूर्णपणे अपयशी ठरली आहे. डीसी ऑफिस एन-ए करते, मात्र लेआउट संमत होत नाही. यामुळे भूखंडांची कमतरता निर्माण होऊन बेळगाव शहर परिसरात आता भूखंडाचे दर अव्वाच्या सव्वा सर्वसामान्यांना न परवडणारे झाले आहेत. एक दशकापेक्षा अधिक काळापासून बुडाकडून एकही नवीन लेआउट विकसित करण्यात आलेला नाही ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. तसेच बुडाने हाती घेतलेल्या भूसंपादन प्रक्रियेतही कोणतीच गती दिसून येत नाही. अनेक फाइल्स प्रलंबित असून जमीन मालक अनिश्चिततेत अडकले आहेत. या प्रशासकीय उदारसीनतेमुळे बेळगाव शहराचा नियोजित विकास पूर्णत: खुंटला आहे.

एकंदर परिस्थिती पाहता बेळगाव शहराचा प्रलंबित मास्टर प्लॅन तात्काळ अंतिम करून अधिसूचना जारी करावी. भूसंपादन प्रक्रिया व नवीन लेआउट विकास त्वरित सुरू करावा. तसेच बुडामध्ये पारदर्शकता, जबाबदारी व कालबद्ध कार्यवाही सुनिश्चित करावी, अशा आमच्या मागण्या आहेत. जर मास्टर प्लॅन राबवता येत नसेल तर बुडा अर्थात बेळगाव शहर विकास प्राधिकरण बरखास्त करून त्याला नगर रचना खात्यामध्ये जोडून टाकावे.

आमच्या या मागणीची जिल्हा प्रशासन आणि बुडाने तात्काळ दखल घेतली नाही तर उपोषणाच्या स्वरूपात आंदोलन हाती घेण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. एक तर शहराच्या मास्टर प्लॅनची प्रक्रिया येत्या 20 फेब्रुवारी रोजी सुरू करावी, अन्यथा 28 फेब्रुवारी रोजी हा प्लॅन नगर रचना विभागाकडे सोपवण्यात यावा अशी मागणी करून आमचा हा प्रस्ताव आज जिल्हाधिकाऱ्यांसमवेत होणाऱ्या आमच्या बैठकीप्रसंगी आम्ही त्यांच्यासमोर मांडणार आहोत, असे आपचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांनी शेवटी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेस आम आदमी पक्षाचे अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.