बेळगाव लाईव्ह : कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या तीन राज्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दड्डी मोहनगा येथील श्री भावेश्वरी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाला आजपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.
यात्रेच्या पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी मोहनगा येथे हजेरी लावून देवीचे दर्शन घेतले. भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात सुरू झालेला हा सोहळा पुढील तीन दिवस चालणार आहे.
यात्रेच्या वेळापत्रकाबाबत माहिती देताना मंदिर ट्रस्टने सांगितले की, सोमवार २ फेब्रुवारीपासून यात्रेला प्रारंभ झाला असून बुधवार ४ फेब्रुवारी रोजी पालखी सोहळ्याने याची सांगता होईल. आज सायंकाळी ६ वाजल्यापासून मंगळवारी सकाळी ६ वाजेपर्यंत मोहनगा येथे ‘शस्त्र इंगळ्या’ हा मुख्य विधी पार पडणार आहे.

मंगळवारी मुख्य यात्रेच्या दिवशी महानैवेद्य आणि दंडवत घालण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. यात्रेनिमित्त मोहनगा परिसरात खेळणी, कापड आणि घरगुती वस्तूंची मोठी दुकाने थाटली गेली आहेत.
विशेष म्हणजे, यात्रेत परंपरेनुसार बोकडांचा बाजारही मोठ्या प्रमाणात भरला आहे. या बाजारात ४ हजार रुपयांपासून ३५ हजार रुपयांपर्यंत बोकडांची विक्री होत असल्याचे पाहायला मिळत आहे. भाविकांच्या सोयीसाठी बेळगाव, संकेश्वर आणि गडहिंग्लज आगारातून जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. घटप्रभा नदीला पाणी असल्याने भाविकांनी मोदगे बंधाऱ्यावरूनच ये-जा करावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मोहनगा भावेश्वरी देवी मंदिर कमिटीने केले आहे.




