बेळगाव लाईव्ह :प्रवासादरम्यान पक्षाच्या धडकेने वीज पुरवठा खंडित होऊन बेंगलोर ते बेळगाव वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सुमारे तासभर मध्येच अडकून पडल्याची घटना काल डोड्डबेले रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी घडली.
बेंगलोरहून बेळगावकडे येणारी वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे (क्र. 26752) काल शुक्रवारी दुपारी बेंगलोरपासून सुमारे 48 कि.मी. अंतरावर असलेल्या डोड्डबेले स्थानकावर जवळपास एक तास थांबवण्यात आली.
एका पक्षाने अचानक दिलेल्या धडकेमुळे रेल्वेचा वीज पुरवठाच खंडित होऊन ती बंद पडली. ही घटना दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली, जेंव्हा पक्ष्याने ट्रेनच्या पॅन्टोग्राफला धडक दिली, ज्यामुळे ओव्हरहेड लाइनमधून वीज पुरवठा घेण्यावर परिणाम झाला.
धडकेमुळे त्या पक्ष्याचा मृत्यू झाल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. नैऋत्य रेल्वेच्या माहितीनुसार, पक्ष्याला हटवल्यानंतर आणि वीज पुरवठा पूर्ववत झाल्यावर रेल्वेने बेळगावकडे आपला प्रवास पुन्हा सुरू केला.




