belgaum

विजेच्या धक्क्याने शाळकरी विद्यार्थीनीचा मृत्यू

0
2930
 belgaum

बेळगाव लाईव्ह |
विजेच्या धक्क्याने शालेय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी सकाळी सांबरा येथे घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

परिनीती चंद्रू पालकर (वय १३, रा. महात्मा फुले गल्ली, सांबरा) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. परिनीती ही सांबरा येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळेत सातवीच्या वर्गात शिक्षण घेत होती.

शुक्रवारी सकाळी घरातील पाण्याची मोटर सुरू करत असताना अचानक तिला विजेचा जोरदार धक्का बसला. धक्का इतका तीव्र होता की परिनीती जागीच खाली कोसळली. घटनेची गंभीरता लक्षात येताच गल्लीतील युवकांनी तत्काळ तिला खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर परिनीतीला मृत घोषित केले.

 belgaum

परिनीतीच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि आजी असा परिवार आहे. परिनीती ही शाळेत एक हुशार व शिस्तप्रिय विद्यार्थिनी म्हणून ओळखली जात होती. अभ्यासाबरोबरच शाळेतील विविध उपक्रमांमध्ये ती नेहमी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत असे.

या दुर्दैवी घटनेमुळे सांबरा गावात हळहळ व्यक्त केली जात असून, परिसरात शोकाकुल वातावरण आहे. विजेच्या उपकरणांबाबत सुरक्षिततेचे उपाय अधिक काटेकोरपणे राबवावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.