बेळगाव लाईव्ह :शनिवारी मध्यरात्रीनंतर कडोली गावात चोरट्यांनी घरफोडी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अंदाजे तीन घरांमध्ये चोरी झाल्याचे निदर्शनास आले असून, या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यांना तातडीने जेरबंद करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
रविवारी कडोली येथे साहित्य संमेलनाची तयारी सुरू असल्याने गावकरी दिवसभर व्यस्त होते. दरम्यान, सर्व गाव झोपी गेल्यानंतर मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी घरपोडी केल्याचे सकाळी उघडकीस आले. यामुळे सकाळपासूनच गावात जोरदार चर्चा सुरू होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू केली आहे. नेमके किती साहित्य चोरीस गेले आहे, याचा अद्याप उलगडा झालेला नाही.
कडोली येथील पुंडलिक पाटील व रामचंद्र बाळेकुंद्री यांच्या घरात चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

कडोली परिसरात यापूर्वीही चोरीचे प्रकार घडले आहेत. काही महिन्यांपूर्वी विहिरीतील पाणी ओढण्याची इंजिने चोरीस गेली होती, तर त्यानंतर एका बैलजोडीचीही चोरी झाली होती. आता पुन्हा घरफोडीचे प्रकार घडल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.
चोरट्यांचा माग काढून कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष घालून संबंधित पोलिसांकडून या प्रकरणाचा छडा लावावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.




