बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून सूत्रे हाती घेतलेल्या के. रामराजन यांनी आज सोमवारी खानापूर तालुक्यातील नंदगड पोलीस ठाण्याला भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी करण्याद्वारे आवश्यक सूचना केल्या.
सदर भेटीप्रसंगी नंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविकुमार धर्मट्टी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांचे स्वागत केले. त्यानंतर पोलीस अधीक्षक रामराजे यांनी पोलीस दलातील शिस्त आणि कार्यक्षमतेवर भर देताना नंदगड पोलीस ठाण्यातील कामकाजाची सविस्तर माहिती घेऊन पाहणी केली.
तसेच अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन जनसेवा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबाबत आवश्यक त्या सूचना केल्या.
याखेरीज पोलिस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपण करून जिल्हा पोलीस अधीक्षक रामराजन यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेशही दिला. याप्रसंगी बैलहोंगलचे पोलीस उपाध्यक्ष डाॅ. वीरय्या हिरेमठ यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते.




