बेळगाव लाईव्ह : श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज बेळगाव व वैश्यवाणी युवा संघटना बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही बेळगाव येथील श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सव सोहळा माघ शुद्ध एकादशी, गुरुवार दि. 29 जानेवारी ते माघ शुद्ध चतुर्दशी, रविवार दि. 1 फेब्रुवारी 2026 या कालावधीत भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे.
चार दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. 29 जानेवारी रोजी पहाटे चौघडा व काकड आरतीने उत्सवाला प्रारंभ होईल. सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेत कुंकूमार्चन होणार असून सकाळी 11 वाजता श्रीदेवी दरबाराचे उद्घाटन होईल. यावेळी प्रमुख उद्घाटक म्हणून प्राध्यापिका सौ. शालिनी अनिल चौगुले उपस्थित राहणार आहेत.
दुपारी 2 ते 3 प.पू. श्री कलावती माता यांचे भजन, 3 ते 4 विवेकानंद भजनी मंडळाचे भजन, संध्या. 4 ते 5 दीपा तबलावादन यांचे भक्ती संगीत, 5 ते 6 सौ. यमन्नक्का भजनी मंडळाचे भजन, 6 ते 7 श्री गजानन भजनी मंडळाचे भजन आणि संध्या. 7 ते 9 कीर्तनकार समर्थ भक्त सौ. दिपाली देशपांडे यांचे कीर्तन होणार आहे.
शुक्रवार दि. 30 जानेवारी रोजी सकाळी 6 ते 7 चौघडा व काकड आरती, सकाळी 7 ते दुपारी 12 लक्ष पुष्पार्चन होईल. दुपारी 2 ते 3 प.पू. श्री कलावती माता यांचे भजन, 3 ते 4 स्वामी विवेकानंद भजनी मंडळाचे भजन, 4 ते 5 भक्ती संस्कृती भजनी मंडळाचे भजन, 5 ते 6 झंकार भजनी मंडळाचे भजन, तर 6 ते 7 श्री.श्री. वामनाश्रम स्वामीजी यांचा सत्संग होणार आहे. त्यानंतर पावणी कार्यक्रमात नवरात्रोत्सवात देवीला परिधान केलेल्या साड्या व खण यांचा जाहीर लिलाव करून, जास्तीत जास्त मागणी करणाऱ्या भक्तांना प्रसाद म्हणून देण्यात येणार आहे.
शनिवार दि. 31 जानेवारी रोजी सकाळी 6 ते 7 चौघडा व काकड आरती, सकाळी 7 ते 11 श्रींना महाभिषेक, दुपारी 12 वाजता मिष्ठान्न व महानैवैद्य अर्पण करण्यात येईल. दुपारी 2 वाजल्यापासून ओटी भरण्यास प्रारंभ होईल. संध्या. 3 ते 4 श्रींची पालखी प्रदक्षिणा काढण्यात येणार असून समादेवी गल्ली, गोंधळी गल्ली, गवळी गल्ली, नार्वेकर गल्ली मार्गे पालखी पुन्हा श्री समादेवी मंदिरात येईल.
पालखी सोहळ्यानंतर रात्री 8 वाजता पावणी कार्यक्रम होणार असून देवीसमोरील चांदीचे नाणे, श्रीफळ तसेच देवीकडील फळफळावळ यांचा जाहीर लिलाव करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडीचे आमदार व महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री दीपक वसंतराव केसरकर उपस्थित राहणार आहेत. तसेच श्री संस्थान शांताश्रम वैश कुलगुरू मठ, हळदीपूरचे माजी अध्यक्ष व चंदगडचे नगराध्यक्ष सुनील सुभाष काणेकर यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

रविवार दि. 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 6.30 ते 11 या वेळेत नवचंडीका होम होणार असून त्यानंतर दुपारी 12 ते 3 महाप्रसादाने उत्सवाची सांगता होईल.
तरी या श्री समादेवी जन्मोत्सव सोहळ्याला व सर्व कार्यक्रमांना वैश्यवाणी समाजबांधव तसेच सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री समादेवी संस्थान व वैश्यवाणी समाजाचे अध्यक्ष श्री महादेव गावडे, सचिव विनायक शहापूरकर, वैश्यवाणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. वर्षा सटवाणी व सेक्रेटरी सौ. मंजुषा देवलापूरकर यांनी केले आहे.




