बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र शासन एकीकडे सीमाप्रश्नासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे भासवून सर्वोच्च न्यायालयात लढा देत असल्याचे सांगते. मात्र, दुसरीकडे कर्नाटक राज्यामध्ये संघटना वाढवण्याच्या नावाखाली शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाकडून अशा लोकांची पाठराखण केली जात आहे, ज्यांना सीमाप्रश्नाचे गांभीर्यच उरलेले नाही.
शिवसेना (एकनाथ शिंदे गट) कर्नाटक शाखेच्या वतीने आज बेळगाव जिल्हाध्यक्ष म्हणून शिवानंद हिरेमठ यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, या निवडीमुळे आणि या वेळी झालेल्या विधानांमुळे सीमावासीयांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून, खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे राज्य सरचिटणीस गंगाधर कुलकर्णी यांनी अत्यंत बेजबाबदार विधान केले. “सीमाप्रश्न आणि भाषिक वाद हे आता महत्त्वाचे उरले नसून हिंदूंचे संरक्षण करणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे,” असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले. या विधानाने सीमावासीयांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.
एकीकडे उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना आजही सीमाप्रश्नासाठी तितक्याच तडफेने आणि तळमळीने उभी आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतरही वेळोवेळी ‘बेळगाव-कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ ही भूमिका केवळ मांडली नाही, तर सीमेवरील मराठी माणसावर जेव्हा जेव्हा अन्याय झाला, तेव्हा महाराष्ट्र बंदची हाक देऊन केंद्र सरकारला हादरवून सोडले. उद्धव ठाकरेंची सीमावासीयांशी असलेली निष्ठा आजही अतूट आहे, हे संपूर्ण देश जाणतो.

मात्र, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ही शिवसेना सीमाप्रश्नापेक्षा हिंदुत्वाला महत्त्व देऊन मराठी माणसाच्या संघर्षाला तिलांजली देत असल्याचे चित्र दिसत आहे. ज्या सीमाभागासाठी महाराष्ट्राने आजवर ६९ हुतात्मे दिले आणि हजारो मराठी तरुणांनी तुरुंगवास भोगला, त्या प्रश्नाला सोयीस्करपणे गौण ठरवणे, हे कितपत योग्य आहे? असा सवाल विचारला जात आहे.
सीमाप्रश्नाचा लढा सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यात असताना अशा पद्धतीची विधाने करून कर्नाटक सरकारच्या हातात आयते कोलीत देण्याचा हा प्रकार आहे असेही बोलले जात आहे.
या निवडीमुळे आणि भूमिकेमुळे एकनाथ शिंदेंना नेमके काय साध्य करायचे आहे, असा सवाल आता विचारला जात आहे. केवळ हिंदुत्वाच्या नावे मराठी भाषिकांच्या मूळ लढ्याला कमकुवत करण्याचे हे राजकीय षडयंत्र तर नाही ना? अशी शंका आता बळावली आहे.
उद्धव ठाकरेंनी जो वारसा जपला आणि सीमावासीयांना जो आधार दिला, तो धुळीस मिळवून शिंदे गट कर्नाटकात केवळ भाजपला अनुकूल ठरेल अशीच भूमिका घेत असल्याचे आजच्या पत्रकार परिषदेवरून स्पष्ट झाले आहे.





