बेळगाव लाईव्ह : “मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्वतःच आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता नेतृत्व बदलावर वारंवार प्रश्न उपस्थित करणे चुकीचे आहे. राज्यात सध्या असा कोणताही बदल होणार नसून मुख्यमंत्री आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील,” अशा स्पष्ट शब्दांत सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी राजकीय वर्तुळातील चर्चेचा धुराळा खाली बसवला.
आज म्हैसूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील सत्तावाटपाच्या बातम्या फेटाळून लावल्या. अर्थसंकल्पानंतर मुख्यमंत्री बदलणार असल्याचा कोणताही फॉर्म्युला अस्तित्वात नाही, असे सांगत जारकीहोळी म्हणाले की, “असे निर्णय घेण्याचे अधिकार माझ्याकडे नाहीत, ते हायकमांड ठरवते. मी सध्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कुठेही नसून २०२८ च्या निवडणुकीच्या वेळी काय होईल ते तेव्हाच बघू.”
बळ्ळारी येथील गोळीबार प्रकरणावर बोलताना त्यांनी तपासाची दिशा स्पष्ट केली. सध्या पोलीस या घटनेचा बारकाईने अभ्यास करत असून प्राथमिक रिपोर्ट आल्यानंतर तो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाहणार आहेत. या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेऊन गरज पडल्यास विद्यमान न्यायाधीशांमार्फत त्याची सखोल चौकशी करण्याचा विचार सरकार करू शकते, असे सूचक विधान त्यांनी यावेळी केले.
म्हैसूरमध्ये पार पडलेल्या ‘अहिंदा’ सभेतून जोर धरलेल्या ‘दलित मुख्यमंत्री’ पदाच्या मागणीवरही त्यांनी भाष्य केले. “लोकशाहीत प्रत्येक समुदायाला आपली मागणी मांडण्याचा अधिकार आहे. दलित मुख्यमंत्री व्हावा अशी चर्चा होणे गैर नाही, मात्र अंतिम निर्णय हायकमांडच्या अखत्यारीत आहे,” असे म्हणत त्यांनी या संवेदनशील मुद्यावर मध्यममार्ग स्वीकारला.




