बेळगाव लाईव्ह :रस्त्यावरील भटक्या कुत्र्याला चुकविण्याच्या नादात भरधाव मोटरसायकल भिंतीवर आदळल्याने एक इसम जागीच ठार झाल्याची घटना काल अथणी (ता. जि. बेळगाव) येथे घडली.
मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी इसमाचे नांव विश्वनाथ बाबू शिरोळ (वय 44, मूळ रा. शिवयोगीनगर, सध्या रा. कुंभारभावी गल्ली, अथणी) असे आहे. विश्वनाथ हा काल रात्री आपल्या मोटरसायकल वरून गावातील नालबंद गल्ली मार्गे कुंभारभावी गल्लीकडे भरधाव जात असताना एक भटके कुत्रे अचानक मोटरसायकल समोर आले. त्याला चुकवण्याच्या नादात मोटरसायकल वरील नियंत्रण सुटल्याने विश्वनाथ थेट समोर असलेल्या भिंतीवर जाऊन आदळून जागीच गतप्राण झाला. अथणी येथे अलीकडे रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ज्याचा गावातील नागरिकांसह शाळकरी मुलांना मोठा त्रास होत आहे. या संदर्भात नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करून देखील त्याची दखल घेतली जात नाही. तेंव्हा तालुका आणि जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अथणी गावातील भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी केली जात आहे.





