बेळगाव लाईव्ह :
‘शृंगार होता संस्कारांचा, अंगार होता हिंदवी स्वराज्याचा, शत्रूही नतमस्तक होई जिथं, असा महापराक्रमी पुत्र होता आमच्या छत्रपती शिवरायांचा…’ या गजरात शुक्रवारी सकाळी ७ वाजता छत्रपती धर्मवीर संभाजीराजे स्मारक समितीच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.
प्रारंभी माजी आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकास दुग्धाभिषेक घालून विधिवत पूजा करण्यात आली. नगरसेवक जयतीर्थ सौन्दत्ती व सुनील जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. महाराजांच्या मूर्तीसमोर भव्य आरती करण्यात आली असून संपूर्ण परिसर आकर्षक फुलांच्या सजावटीने नटला होता.
यावेळी बोलताना माजी आमदार अनिल बेनके म्हणाले,
भारताच्या इतिहासात १६ जानेवारी हा दिवस अत्यंत अभिमानास्पद आहे. १६ जानेवारी १६८१ रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला. वयाच्या अवघ्या ३२व्या वर्षी १२८ युद्धे जिंकणारे संभाजी महाराज हे पराक्रमाचे जिवंत प्रतीक होते. ते अठराव्या वर्षी युवराज आणि तेविसाव्या वर्षी छत्रपती झाले. रायगडावर झालेला त्यांचा राज्याभिषेक हा इतिहासातील सुवर्णक्षण आहे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी २०१ युद्धे लढली आणि एकाही युद्धात पराभव पत्करला नाही. स्वराज्य व स्वधर्मासाठी त्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले. अशा थोर राजाला मानाचा मुजरा, असे आवाहन त्यांनी केले.

स्मारक समितीचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,
छत्रपती संभाजी महाराजांनी संपूर्ण आयुष्य स्वराज्याच्या रक्षणासाठी वाहिले. कमी वयात सर्वाधिक युद्धे जिंकून शत्रूंवर विजय मिळवला. स्वराज्याचे पालनपोषण व संरक्षण केले. हा प्रेरणादायी इतिहास बेळगाव शहरात त्यांच्या स्मारकाच्या माध्यमातून कायम जिवंत ठेवण्यासाठी स्मारक समिती सातत्याने प्रयत्नशील आहे. ‘जगावे कसे हे शिवरायांनी शिकवले, तर मरावे कसे हे शंभूराजांनी शिकवले’, असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.
या कार्यक्रमास नगरसेवक जयतीर्थ सौन्दत्ती, धर्मवीर संभाजीराजे सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष सुनील जाधव, प्रसाद मोरे, श्रीनाथ पवार, निशांत कुडे, मारुती पाटील, यश पाटील, आदित्य पाटील, सुशांत तरहळेकर, निखिल पाटील, उदित रेगे, किसन खांडेकर, योगेश भोसले, भरत काळगे तसेच छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीचे सदस्य, महिला भगिनी, युवक, पदाधिकारी व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





