बेळगाव लाईव्ह :विश्वेश्वरय्यानगर बेळगाव येथील घरातून भांडून पाच-सहा दिवस बेपत्ता झालेल्या युवतीचा अवघ्या एक दिवसात तपास लावून तिला तिच्या कुटुंबीयांकडे सुखरूप सुपूर्द केल्याबद्दल विश्वेश्वरय्यानगर येथील नागरिकांतर्फे एपीएमसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उस्मान आवटी यांचा आज सत्कार करण्यात आला.
एपीएमसी पोलीस ठाण्याच्या आवारात आयोजित या सत्कार समारंभाप्रसंगी आपल्या प्रास्ताविकात माजी महापौर विजय मोरे यांनी सांगितले की, विश्वेश्वरय्यानगर येथील एक युवती घरात भांडण करून स्वतःसोबत मोबाईल वगैरे कोणतेही संपर्काचे साहित्य न घेता 5 -6 दिवस बेपत्ता झाली होती.
तथापि एपीएमसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उस्मान आवटी व त्यांच्या सहकाऱ्यांनी फक्त रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अतिशय उत्तमरीत्या तत्परतेने तपास मोहीम राबवून बेंगलोरपर्यंत पोहोचलेल्या त्या युवतीचा अवघ्या एका दिवसात छडा लावला.
तसेच बेंगलोर येथे अतिथी गृहात (पीजी) राहणाऱ्या त्या युवतीबद्दल तिच्या घरच्यांना माहिती देऊन आपल्याला लगेच बेंगलोरला निघावे लागेल असे सांगितले. त्यावेळी त्यांची घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याचे निदर्शनास येताच सीपीआय आवटी यांनी भाडोत्री गाडीची सोय करून त्यांना बेंगलोरला नेले.
तेथे त्या युवतीला तिच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करून सर्वांना सुखरूप माघारी बेळगावला आणले. पोलीस निरीक्षक आवटी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राबवलेली ही तपास मोहीम बेळगाव पोलीस प्रशासनासाठी अभिमानास्पद अशी होती. आजकाल पोलिसांबद्दल जनमानसात सर्वसामान्यपणे भीतीचीच भावना असते.

परंतु ते चुकीचे आहे हे एपीएमसी पोलिसांनी दाखवून दिले आहे. त्यांनी जर हात झटकले असते तर अद्यापपर्यंत ती युवती सापडली नसती असे सांगून त्यासाठीच विश्वेश्वरय्यानगरवासियांतर्फे आम्ही आवटी साहेबांचा सत्कार करून एपीएमसी पोलिसांचे आभार मानत आहोत, असे माजी महापौर विजय मोरे म्हणाले.
मोरे यांच्या भाषणानंतर एपीएमसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उस्मान आवटी यांचा पुष्पहार, शाल घालून तसेच भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ॲलन विजय मोरे, के. वाय. रवींद्र, चंद्रशेर, दयानंद कदम, अवधूत तुडवेकर, गंगाधर पाटील, निलेश, सुधीर चौगुले आदींसह विश्वेश्वरय्यानगरवासीय आणि एपीएमसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते.





