बेळगाव लाईव्ह : प्रभुनगर (ता. खानापूर) येथील राष्ट्रीय महामार्गावरील पुलावर झालेल्या भीषण दुचाकी अपघातात खानापूर येथील एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे खानापूर शहरासह परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खानापूर येथील निंगापूर गल्ली येथील सुरज संजय कुंडेकर (वय २२) आणि दुर्गानगर येथील गणेश बुचडी (वय २३) हे दोघे मित्र ३१ डिसेंबरच्या निमित्ताने बाहेर जेवणासाठी गेले होते. जेवण आटोपून ते दुचाकीवरून खानापूरकडे परतत असताना प्रभुनगर येथील राष्ट्रीय महामार्गावरील पुलावर दुचाकीवरील नियंत्रण सुटले.
यामुळे दुचाकी पुलाच्या बाजूच्या संरक्षक कठड्याला जोरदार धडकली. अपघात इतका भीषण होता की दोघेही युवक उडून थेट पुलाखालील सर्व्हिस रस्त्यावर कोसळले. या अपघातात सुरज कुंडेकर याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.

त्याला तातडीने बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष पंडित ओगले यांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमी युवकांच्या मदतीसाठी प्रयत्न केले. मात्र सुरजचा जीव वाचू शकला नाही.
दरम्यान, अपघातात गंभीर जखमी झालेल्या गणेश बुचडी याला पुढील उपचारासाठी बेळगाव येथील केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक मात्र स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या दुर्दैवी अपघातामुळे खानापूर शहर व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून सर्व स्तरांतून शोक व्यक्त केला जात आहे.




