बेळगाव लाईव्ह :
पिरनवाडी येथे आयोजित हिंदू संमेलनादरम्यान प्रक्षोभक भाषण करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी हर्षिता ठाकूर यांच्यासह सात जणांविरुद्ध बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर शहरात निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दोषींवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.
पोलीस आयुक्तांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, समाजात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या कोणत्याही प्रवृत्तीला खपवून घेतले जाणार नाही. प्रक्षोभक भाषणे देणाऱ्या व कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या व्यक्तींकडून १० लाख रुपयांचा जामीन बाँड लिहून घेतला जाणार असून, भविष्यात अशा प्रकारांची पुनरावृत्ती झाल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.
शहरातील शांतता व सलोखा अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन सक्रिय झाले असून, लवकरच हिंदू व मुस्लिम समाजातील प्रमुख नेत्यांची संयुक्त बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत शांतता राखण्यासाठी सर्व समाजघटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येणार आहे.
दरम्यान, सोशल मीडियावरून अफवा, प्रक्षोभक व्हिडिओ अथवा द्वेषमूलक संदेश पसरवणाऱ्यांवर सायबर सेलची करडी नजर असून, अशा पोस्ट आढळल्यास त्वरित गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलीस आयुक्तांनी दिला.

“बेळगावची ओळख शांतताप्रिय व सौहार्दपूर्ण शहर म्हणून आहे. हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा ब्रँड टिकवण्यासाठी नागरिकांनी जबाबदारीने वागावे आणि पोलिसांना सहकार्य करावे,” असे आवाहनही पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी केले आहे.





