बेळगाव लाईव्ह : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार शोषण करणाऱ्या एका २३ वर्षीय नराधमाला बेळगावच्या पहिल्या अतिरिक्त जिल्हा व सत्र (विशेष जलदगती पोक्सो) न्यायालयाने ३० वर्षांच्या सश्रम कारावासाची कठोर शिक्षा सुनावली आहे. स्वप्नील राजाराम माने (रा. चेन्नीकोप्पी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, आरोपीने पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला होता. इतकेच नव्हे तर तिचे अश्लील फोटो काढून ते व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तिच्या घरच्यांना पाठवून धमकी देत पीडितेचा मोबाईलही हिसकावून नेला होता. याप्रकरणी चिक्कोडी पोलीस ठाण्यात २०२३ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
चिक्कोडीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विश्वनाथ चौगुले यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी न्यायाधीश श्रीमती सी. एम. पुष्पलता यांच्यासमोर झाली. सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांनी ११ साक्षीदार, ८४ कागदोपत्री पुरावे आणि १३ जप्त वस्तू न्यायालयात सादर केल्या.
हे सर्व पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला पोक्सो कायद्याच्या कलम ६ अंतर्गत ३० वर्षांचा सश्रम कारावास आणि १ लाख रुपये दंड ठोठावला.
याव्यतिरिक्त, आयटी कायद्याच्या विविध कलमांखाली आरोपीला अतिरिक्त कारावास आणि दंड सुनावण्यात आला असून, एकूण दंडाची रक्कम २ लाख ६३ हजार रुपये इतकी आहे. तसेच, पीडित मुलीला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून ४ लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील एल. व्ही. पाटील यांनी या प्रकरणात प्रभावीपणे बाजू मांडली.





