बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील सावगाव येथील फार्महाऊसवर एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करणाऱ्या दोन नराधमांना जिल्हा सत्र न्यायालयाने ‘मरेपर्यंत जन्मठेप’ आणि त्यांच्या दोन साथीदारांना २० वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावली आहे. १० मे २०२५ रोजी घडलेल्या या संतापजनक घटनेचा निकाल शनिवारी न्यायाधीश श्रीमती सी. एम. पुष्पलता यांनी दिला.
या प्रकरणातील मुख्य आरोपी साकीबबेग फयाज निजामी (वय २२, रा. गांधीनगर) आणि रवी सिद्धप्पा नाईकडी (वय ३४, रा. राजारामनगर) यांनी पीडितेचे अपहरण करून तिला सावगाव येथील एका फार्महाऊसवर नेले होते. तिथे पीडितेला बळजबरीने मद्य पाजून तिच्यावर अमानवीय अत्याचार केले आणि तिच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून घेतली. या गुन्ह्यात त्यांना जागा उपलब्ध करून देणारे आणि सहकार्य करणारे रोहन पाटील व आशुतोष पाटील या दोघांनाही न्यायालयाने २० वर्षांच्या कारावासाची अद्दल घडवली आहे.
या खटल्यात सरकारी पक्षातर्फे विशेष वकील एल. व्ही. पाटील यांनी भक्कम पुरावे सादर केले. न्यायालयाने चारही आरोपींना मिळून एकूण २९ लाख ५२ हजार रुपये दंड ठोठावला असून, पीडित मुलीला जिल्हा कायदेशीर सेवा प्राधिकरणाकडून १० लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.





