बेळगाव लाईव्ह :गेल्या तब्बल 36 वर्षांपासून गटारी, रस्त्यांसह विविध मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित असल्यामुळे संतप्त झालेल्या नेहरूनगर, बेळगाव येथील बुरुड कॉलनीतील रहिवाशांनी आज सकाळी कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल येथे आंदोलन छेडले तसेच येत्या संबंधित मूलभूत सुविधा संदर्भात तात्काळ कार्यवाही न झाल्यास होत्या 26 जानेवारी रोजी धरणे सत्याग्रह करण्याचा इशारा दिला आहे.
मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित असलेल्या बुरुड कॉलनी रहिवासी संघातर्फे आज सोमवारी सकाळी कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल येथे तीव्र आंदोलन छेडण्यात आले. यावेळी सदर कॉलनीतील रहिवाशांनी मोठ्या संख्येने जमून बेळगाव महापालिका आणि सरकारच्या विरोधात धिक्काराच्या घोषणा देत जोरदार निदर्शने केली. या आंदोलनामध्ये विशेष करून गृहिणींचा सहभाग लक्षणीय होता. त्यांना चन्नम्मा सर्कल येथील आंदोलनानंतर रहिवाशांनी मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
चन्नम्मा सर्कल येथे बेळगाव लाईव्हशी बोलताना बुरुड कॉलनी येथील त्रस्त रहिवाशी मीनाक्षी काकतीकर यांनी सांगितले की, स्लम बोर्डाकडून आम्हाला 35 -40 वर्षांपूर्वी एपीएमसी रोडवरील बुरुड कॉलनी येथे घरे मिळाली आहेत. त्यावेळी सुरुवातीला आमच्या कॉलनी जी कांही विकास कामे झाली होती ती तेवढीच, त्यानंतर आजपर्यंत तेथे एकही विकास काम राबविण्यात आलेले नाही. आमच्या कॉलनीतील ड्रेनेज तुंबलेले आहेत. गटारींची सोय नसून चांगले रस्ते नाहीत.

लोकप्रतिनिधी व नेते मंडळींना निवडणुकी वेळीच आमच्या कॉलनीची आठवण येते. त्यावेळीही त्यांच्याकडून फक्त आश्वासन देण्यापलीकडे काहींही घडत नाही, कोणीही नंतर आमच्या कॉलनीकडे फिरकत नाही. स्थानिक नगरसेवकांकडे वारंवार तक्रार करूनही ते देखील त्याची दखल घेत नाहीत. गेल्या दोन वर्षापासून मी व माझे सहकारी बेळगाव महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम खात्याकडे अर्ज करून विकास कामांसाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे.
तथापि कोणीही आमच्या मागणीची दखल घेण्यास तयार नाही. महापालिकेच्या डम्पिंग ग्राउंडच्या शेजारीच आमची कॉलनी आहे. मध्यवर्ती ठिकाणी असूनही आमच्या कॉलनीकडे दुर्लक्ष केले जात आहे. कॉलनीमध्ये स्वच्छता केली जात नाही. पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. गटारी आणि ड्रेनेजच्या समस्येमुळे पावसाळ्यात आमच्या कॉलनीतील मंदिराचे पावित्र्य धोक्यात येत असते परवाच झालेल्या मुसळधार पावसावेळी ड्रेनेज व गटारीचे सांडपाणी मंदिरात शिरले होते.
आम्हाला कोणीच वाली राहिला नाही असे वाटू लागले आहे. त्यासाठीच आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत आहोत. आमच्या कॉलनीतील नागरी समस्या सोडवण्यासंदर्भात तात्काळ कार्यवाही झाली नाही तर येत्या 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी आम्ही धरणे सत्याग्रहाला बसू.
त्यावेळी आम्ही सर्व स्त्रीपुरुष मिळून नेहरूनगरचा मुख्य रस्ता रस्ता रोको करून अडवू. एवढेच नाही तर आमच्या मागणीची तात्काळ दखल न घेतल्यास आगामी निवडणुकीच्या मतदानावर आम्ही बहिष्कार घालू, असा परखड इशारा मीनाक्षी काकतीकर यांनी दिला.





