बेळगाव लाईव्ह : ब्रिटीश सत्तेविरुद्ध क्रांतीचे रणशिंग फुंकणारे थोर स्वातंत्र्यसेनानी क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांच्या शौर्याची साक्ष देणाऱ्या ‘वीरभूमी’ वस्तू संग्रहालयाचे आणि त्यांच्या भव्य पुतळ्याचे लोकार्पण मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते पार पडले.
नंदगड येथील रुरल एज्युकेशन सोसायटीच्या मैदानावर आयोजित या सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी विविध विकासकामांचे भूमिपूजन करत रायण्णांच्या बलिदानाचा गौरव केला. हे स्मारक येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणास्थान ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
ब्रिटीशांशी लढताना बलिदान दिलेल्या संगोळी रायण्णा यांच्यासह सात हुतात्म्यांना नंदगडमध्ये फाशी देण्यात आली होती, असे सांगत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या सर्व हुतात्म्यांच्या समाधी स्थळांचा सर्वांगीण विकास करण्याची घोषणा केली. रायण्णांचे नाव घेताच अंगावर रोमांच उभे राहतात आणि त्यांच्या गौरवार्थ संगोळीमध्ये आधीच सैनिक शाळा व शौर्यभूमी उभारण्यात आली असल्याचे त्यांनी नमूद केले. रायण्णांचे जन्मगाव संगोळी आणि त्यांचे समाधी स्थळ असलेले नंदगड या दोन्ही गावांना राष्ट्रीय स्तरावरील पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणे हे सरकारचे ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वीरभूमीमध्ये शिल्पकृतींच्या माध्यमातून रायण्णांच्या जीवनसंघर्षाचा प्रवास उलगडण्यात आला असून, हे स्थान पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरेल असे मुख्यमंत्री म्हणाले. प्रत्येक नागरिकाने राष्ट्रप्रेमाची जोपासना करून संविधानाचे रक्षण करणे गरजेचे असून शिक्षण, स्वाभिमान आणि ज्ञानाच्या जोरावरच समाजाची प्रगती शक्य आहे, असे विचार त्यांनी मांडले. कर्नाटकात राहणाऱ्या प्रत्येकाने कन्नड भाषेचा वापर करून तसे वातावरण निर्माण करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी आपल्या मनोगतातून या स्मारकाच्या उभारणीचा प्रवास उलगडला. २०१३ मध्ये वीरभूमीच्या निर्मितीचे जे स्वप्न पाहिले होते, ते आज पूर्णत्वास आले असून यामुळे नंदगडला देशाच्या नकाशावर एक विशेष ओळख प्राप्त झाली आहे, असे त्यांनी म्हटले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून खानापूर तालुक्यात अनेक पुलांची आणि रस्त्यांची कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती त्यांनी दिली.
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी रायण्णांच्या शौर्याचा उल्लेख करत हे स्मारक भविष्यात राष्ट्रीय स्मारक म्हणून ओळखले जावे, अशी भावना व्यक्त केली. राज्य सरकारने रायण्णांचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी उचललेले हे पाऊल अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. तर मंत्री शिवराज तंगडगी यांनी रायण्णा आणि कित्तूर चन्नम्मा यांचा इतिहास राष्ट्रपातळीवर पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले.
नगरविकास मंत्री भैरलती सुरेश यांनी क्रांतीवीर संगोळी रायण्णा क्षेत्र विकास प्राधिकरणाला आवश्यक तो सर्व निधी आणि सहकार्य पुरवण्याचे आश्वासन दिले. निवडणूक पूर्व आश्वासनानुसार गॅरंटी योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. गॅरंटी योजना अंमलबजावणी प्राधिकरणाचे अध्यक्ष एच.एम. रेवण्णा यांनी या संग्रहालयाची तुलना देशातील सर्वोत्कृष्ट स्मारकांशी करत पर्यटकांच्या सोयीसाठी बेळगाव ते नंदगड विशेष बस सेवा सुरू करण्याची मागणी केली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणारे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी नंदगडच्या पवित्र भूमीवर रायण्णांचे स्मारक होणे ही भाग्याची गोष्ट असल्याचे सांगत खानापूर मतदारसंघातील रस्ते विकास आणि मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी अतिरिक्त निधीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.
या सोहळ्याला कागिनेले कनक गुरुपीठाचे जगद्गुरु श्री डॉ. निरंजनानंदपुरी महास्वामीजींचे दिव्य सान्निध्य लाभले. कार्यक्रमाला अशोक पट्टण, महांतेश कौजलगी, विश्वास वैद्य, गणेश हुक्केरी, आसिफ सेठ, बाबासाहेब पाटील, चन्नराज हट्टीहोळी यांसह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





