बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने खजिनदार प्रकाश मरगाळे व तज्ञ समिती सदस्य दिनेश ओऊळकर यांच्यासह समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बारामती येथील गोविंदबाग येथे जाऊन ज्येष्ठ नेते माननीय शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन व्यक्त केले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांचीही उपस्थिती होती.
समिती पदाधिकाऱ्यांनी अजितदादा पवार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असता, शरद पवार यांनी स्वतःचे दुःख बाजूला ठेवून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सीमाप्रश्नी सुरू असलेल्या खटल्याची सविस्तर माहिती विचारून घेतली.
यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सीमाभागात सुरू असलेल्या कन्नड सक्तीबाबतची सविस्तर माहिती शरद पवार यांना दिली. तसेच अल्पसंख्यांक आयोग व सीमा प्रश्नासंदर्भातील घडामोडींवरही चर्चा करण्यात आली.
सीमाप्रश्नाबाबत संसदेत आवाज उठवावा, अशा सूचना शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना दिल्या. तसेच आपण स्वतः दिल्ली दौऱ्यावर गेल्यानंतर या विषयात जातीने लक्ष घालू, असे आश्वासनही शरद पवार यांनी समिती पदाधिकाऱ्यांना दिले.
यावेळी उमेश पाटील, शिवाजी पाटील, सुहास हुद्दार, शुभम हंडे आदी उपस्थित होते.





