बेळगाव लाईव्ह :आगामी प्रजासत्ताक दिन नीटनेटक्या पद्धतीने सन्मानपूर्वक साजरा करण्यासाठी आवश्यक सर्व तयारी करण्याची सूचना आज जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज शुक्रवारी सकाळी पार पडलेल्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्या बैठकीत ते बोलत होते. आगामी प्रजासत्ताक दिन अर्थपूर्णरित्या साजरा करण्यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आले आहेत. सर्व अधिकाऱ्यांनी एकमेकात समन्वय राखून काम करावे. प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी रोजी सर्व सरकारी कार्यालयांनी ध्वजारोहण करून सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सकाळी 9 वाजता बेळगाव जिल्हा क्रीडांगणावर उपस्थित राहणे सक्तीचे असेल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत स्पष्ट केले.
प्रजासत्ताक दिन कार्यक्रमास शहरातील सर्व शाळा-कॉलेजीस आणि वस्तीगृहातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित राहतील, याची व्यवस्था संबंधित अधिकाऱ्यांनी करावी. प्रजासत्ताक दिनी होणारे पतसंंचालन, ध्वजारोहण, व्यासपीठाची व्यवस्था वगैरे आवश्यक सर्व गोष्टींची संबंधित खात्याने समन्वयाने समर्पक पूर्तता करावी. त्याचप्रमाणे कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका छापताना शिष्टाचारानुसार त्यामध्ये मान्यवरांना स्थान देऊन त्यांचा सन्मान राखावा.

प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील प्रमुख चौकांची स्वच्छता करून त्यांचे विद्युत रोषणाईसह सुशोभीकरण केले जावे. जिल्हा क्रीडांगणावरील कार्यक्रमाच्या ठिकाणी वैद्यकीय पथक आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जावी असे सांगून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती आणि स्थानिक संस्थांनी शिष्टाचारानुसार ध्वजारोहण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले.
बैठकीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा सत्कार करण्यासंदर्भात करण्यात आली. बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होणकेरी महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम., अतिरिक्त पोलीस अधीक्षक आर. बी. बसर्गी, प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी डॉ. भानुप्रकाश जे., अन्न व नागरी पुरवठा खात्याचे उपसंचालक मल्लिकार्जुन नायक, क्रीडा खात्याचे उपसंचालक बी. श्रीनिवास, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक राजेंद्र कलघटगी, दलित नेते मल्लेश चौगुले, विकास कलघटगी आदींसह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.




