बेळगाव लाईव्ह:बेळगाव किल्ला तलाव येथे भगवान गौतम बुद्धांची भव्य मूर्ती उभारण्याच्या दृष्टीने आवश्यक पूर्वतयारी सुरू असून, केएलई परिसरात राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याच्या चौकात छत्रपती शाहू महाराजांची मूर्ती उभारण्यासाठी बेळगाव उत्तरचे आमदार असिफ राजू सेठ आमदार निधीतून निधी उपलब्ध करून देणार आहेत, अशी माहिती कर्नाटक राज्य दलित संघर्ष समिती (भीमवादी) चे विभागीय संचालक रवी बस्तवाडकर यांनी दिली.
बेळगाव किल्ला तलाव येथे भगवान गौतम बुद्धांची मूर्ती तसेच केएलईजवळ राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याच्या चौकात छत्रपती श्री शाहू महाराज यांची मूर्ती बसवण्यासंदर्भात आज, सोमवारी बेळगाव महापालिकेत महापौर मंगेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीस नगरसेवक, महापालिका अधिकारी तसेच कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर रवी बस्तवाडकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
बेळगाव किल्ला तलावाच्या मध्यभागी भगवान गौतम बुद्धांची १०० फूट उंचीची मूर्ती आणि केएलई परिसरातील राष्ट्रीय महामार्ग जोडणाऱ्या चौकात छत्रपती श्री शाहू महाराज यांची मूर्ती उभारण्याचा ठराव बेळगाव महापालिकेने सन २०१६ मध्ये एकमताने मंजूर केला होता. मात्र, आजपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नसल्याने तात्काळ कार्यवाही करावी, या मागणीसाठी चार दिवसांपूर्वी कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीतर्फे बेळगाव महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. त्या वेळी महापौरांनी मागणीबाबत तातडीने बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले होते.

त्या अनुषंगाने आज सुमारे दोन तास चाललेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. चर्चेअंती किल्ला तलाव येथे भगवान गौतम बुद्धांची मूर्ती बसवण्यास महापालिकेची कोणतीही हरकत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता सुरू असल्याचे सांगण्यात आले. तसेच छत्रपती शाहू महाराजांची मूर्ती उभारण्याची जबाबदारी बेळगाव उत्तरचे आमदार असिफ राजू सेठ यांनी स्वीकारली असून, ही मूर्ती आमदार निधीतून उभारण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. भगवान बुद्धांच्या मूर्तीच्या संदर्भातही महापालिका तसेच जिल्हा पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन देण्यात आल्याचे रवी बस्तवाडकर यांनी सांगितले.
या वेळी कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीचे संघटना संचालक कल्लाप्पा रामचन्नावर, जिल्हा संघटना संचालक संतोष कांबळे, बेळगाव तालुका अध्यक्ष मनोज हित्तलमणी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.





