बेळगाव लाईव्ह : बेळगाव येथील माळमारुती पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत पोलिसांनी धाडसी कारवाई करून अवैध डिझेलची वाहतूक करणारा टँकर जप्त केला आहे.
या कारवाईत सुमारे २७ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६/२०२६ नुसार जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३, ७, १० आणि भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २೮७, ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच मोटर स्पिरीट आणि हाय स्पीड डिझेल (पुरवठा नियंत्रण) आदेश २००५ च्या विविध कलमांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईत पोलिसांनी १२ लाख रुपये किमतीचा टॅटा कंपनीचा टँकर (क्रमांक GJ-12-BT-7089) आणि त्यातील १५ लाख रुपये किमतीचे सुमारे १७ हजार लिटर डिझेल असा एकूण २७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पेट्रोलियम उत्पादनांची बेकायदेशीर विक्री किंवा गैरप्रकार रोखण्यासाठी ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

या यशस्वी मोहिमेत पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर, उपनिरीक्षक होन्नप्पा तळवार, श्रीशैल, उदय पाटील, पी. एम. मोहिते आणि त्यांच्या पथकातील एम. जी. कुरेर, सी. आय. चिगरी, के. बी. गौराणी, आर. जी. जिन्नेजी यांच्यासह तपास साहाय्यक गोपाळ लट्टी, सिद्धनाथ मराठे, दीपक बिचगत्ती आणि इतर कर्मचाऱ्यांनी कौतुकास्पद कामगिरी केली.
या कामगिरीबद्दल बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन करून त्यांचे विशेष कौतुक केले आहे.





