belgaum

पौर्णिमा यात्रेसाठी यल्लम्मा डोंगर सज्ज

0
329
 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक, गोवा, महाराष्ट्रासह विविध राज्यांतील लाखो भाविकांची आराध्य देवता सौंदत्ती येथील श्री रेणुका यल्लम्मा
डोंगर पौर्णिमा यात्रेच्या पार्श्वभूमीवर सर्व सुविधांसह सज्ज झाला आहे. श्री रेणुका यल्लम्मा क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या विशेष पुढाकारातून भाविकांच्या सोयीसाठी व्यापक तयारी करण्यात आली आहे.


यासंदर्भात झालेल्या अधिकाऱ्यांच्या पूर्वतयारी समन्वय बैठकीत माहिती देताना प्राधिकरणाचे कार्यदर्शी डॉ. सिध्दू हुल्लोळी यांनी सांगितले की, हिवाळ्याचा कालावधी लक्षात घेऊन भाविकांसाठी 28 स्नानगृहांमध्ये गरम पाण्याची सोय करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी पुरेशा प्रकाशासाठी 41 हायमास्ट दिवे बसविण्यात आले आहेत.


भाविकांच्या सोयीसाठी 50 ठिकाणी मोबाईल चार्जिंग पॉईंट्स उभारण्यात आले आहेत. वाहनांची वाहतूक व पार्किंग सुरळीत व्हावे यासाठी मार्गदर्शक फलक लावण्यात आले असून, बैलगाड्यांमधून येणाऱ्या भाविकांसाठी जनावरांना पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व नळ बसविण्यात आले आहेत.


बंदोबस्तासाठी सुमारे एक हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असून, भाविकांच्या सोयीसाठी ‘भक्तस्नेही संपर्क केंद्र’ सुरू करण्यात येणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून भाविकांना माहिती देणे तसेच त्यांच्या तक्रारींवर तात्काळ उपाय करण्यात येणार आहे.


सकाळी व सायंकाळी पूजेच्या वेळेव्यतिरिक्त उर्वरित सर्व वेळेत भाविकांना देवीचे दर्शन घेता येणार आहे. विविध विभागांच्या समन्वयातून भाविकांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न प्राधिकरणातर्फे करण्यात आला आहे. क्षेत्रात येणाऱ्या भाविकांनी तसेच कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी परस्पर समन्वय, सौजन्य राखून शांतता व शिस्त पाळावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.


या बैठकीस उपकार्यदर्शी श्रीमती नागरत्न चोळीन, डीवायएसपी चिदंबरम, सीपीआय सुरेश बंडेगुंबळ यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.