बेळगाव लाईव्ह :मोबाईलचा अतिरेक माणसांमधील संवाद, प्रेम, जिव्हाळा कमी करत आहे. घरात असूनही आपण एकमेकांपासून दूर जात आहोत. त्यामुळे महिलांनी देखील मोबाईलचा वापर गरजेपुरता करा आणि माणसांशी मनापासून संवाद साधा असा सल्ला जिजामाता हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका लीला पाटील यांनी दिला आहे.
महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडी, बेळगाव यांच्यातर्फे आयोजित हळदी-कुंकू समारंभ सोमवारी सायंकाळी लोकमान्य रंगमंदिर, कोनवाळ गल्ली येथे विविध उपक्रमांसह उत्साहात पार पडला त्या प्रमुख वक्त्या म्हणून या कार्यक्रमात बोलत होत्या.
महिला आघाडीच्या अध्यक्षा व माजी उपमहापौर रेणू सुहास किल्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेच्या नूतन संचालिका दिपाली दळवी उपस्थित होत्या. व्यासपीठावर महिला आघाडीच्या सेक्रेटरी व माजी महापौर सरिता पाटील तसेच उपाध्यक्ष नगरसेविका सुधा भातकांडे उपस्थित होत्या.
‘बाईपण कसे भारी आहे’ हे आपण स्वतः सिद्ध केले पाहिजे. स्वतःवर विश्वास ठेवा, आत्मसन्मान जपा आणि एकमेकींच्या पाठीशी उभे रहा. नारीशक्ती एकत्र आली तर कोणतेही कार्य अशक्य नाही. सावित्रीबाई फुले यांनी दाखवलेला शिक्षणाचा मार्ग आजही आपल्याला प्रेरणा देतो असेही त्यांनी सांगितले.
प्रारंभी अर्चना देसाई व सहकाऱ्यांच्या ईशस्तवन आणि स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर प्रमुख पाहुण्या व मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. अध्यक्षा रेणू किल्लेकर यांच्या प्रास्ताविकानंतर पाहुण्यांचा परिचय अर्चना कावळे आणि मंजुश्री कोळकर यांनी करून दिला.

यानंतर समाजसेविका विद्या कानोलकर यांचा सत्कार करण्यात आला. हळदी-कुंकू समारंभाच्या निमित्ताने तिळगुळाचे दागिने परिधान करून कॅटवॉक स्पर्धा तसेच होम मिनिस्टर स्पर्धा घेण्यात आल्या. कॅटवॉक स्पर्धेत स्नेहल श्रीहर्षा यांनी प्रथम, दया शिंदे यांनी द्वितीय, तर आरती शिंदे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. रेश्मा सावंत व राणी देगोळे यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. होम मिनिस्टर स्पर्धेचे विजेतेपद सौ. प्रेरणा वटावकर यांनी मिळविले.
यावेळी स्नेहल बर्डे यांनी अध्यक्षा रेणू किल्लेकर यांच्यावर लिहिलेली कविता सादर केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया कुडची यांनी केले, तर सेक्रेटरी सरिता पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.
हा समारंभ यशस्वी करण्यासाठी अर्चना कावळे, कांचन भातकांडे, भाग्यश्री जाधव, रेखा गोजगेकर, अर्चना देसाई, मंजुश्री कोलेकर, आशा सुपली, अनुपमा कोकणे, प्रभावती सांबरेकर आदींनी विशेष परिश्रम घेतले. मोठ्या संख्येने शहरातील महिलांनी या समारंभास उपस्थिती लावली.





