बेळगाव लाईव्ह :कर्नाटक–महाराष्ट्र सीमेवरील कुद्रेमानी (ता. जि. बेळगाव) या छोट्याशा गावाने संपूर्ण बेळगाव जिल्ह्याचा मान उंचावणारी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. या गावातील एक-दोन नव्हे, तर तब्बल 9 युवक-युवतींनी एकाच वेळी केंद्रीय सुरक्षा दलांमध्ये प्रवेश मिळवला असून, ही घटना जिल्ह्यासाठी दुर्मिळ व ऐतिहासिक ठरली आहे.
कुद्रेमानी गावातील 7 युवक व 2 युवतींनी केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), सीमा सुरक्षा दल (BSF) आणि भारत-तिबेट सीमा पोलीस दल (ITBP) मध्ये भरती होऊन देशसेवेची शपथ घेतली आहे. संरक्षण दलात भरती झालेल्यांमध्ये ओमकार गुरव, जय पाटील, राजू पाटील, विजय पाटील, भरमू गुरव, राकेश पन्हाळकर, साहिल पाटील, संजीवनी पाटील आणि दीक्षा धामणेकर यांचा समावेश आहे.
एका गावातील इतक्या मोठ्या संख्येने युवक-युवती एकाच वेळी देशाच्या संरक्षण दलात दाखल होण्याची बेळगाव जिल्ह्यातील ही बहुधा पहिलीच घटना असल्याचे मानले जात आहे. या अभिमानास्पद यशाबद्दल गावात विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या समारंभात संरक्षण दलात भरती झालेल्या सर्व युवक-युवतींचा मानाचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला. तसेच त्यांच्या धैर्य, मेहनत आणि देशभक्तीचे कौतुक करत पुढील सेवावाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या या यशामुळे कुद्रेमानी गावासह संपूर्ण जिल्ह्याचा नावलौकिक वाढल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

या सत्कार समारंभास बलभीम साहित्य संघ व ग्रामस्थ कुद्रेमानी यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. यावेळी साहित्य संघाचे अध्यक्ष उमेश गुरव, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी मुरकुटे, शांताराम पाटील यांच्यासह नागेश राजगोळकर, महादेव गुरव, मल्लाप्पा गुरव, परशुराम पाटील, जी. जी. पाटील, दत्ता कांबळे, काशिनाथ गुरव, शिवाजी शिंदे, शांताराम गुरव, मारुती पाटील, लखन धामणेकर, महेश पाटील, नागेश बोकमूरकर, अनंत लोहार, विनायक जांबोटकर, दीपक मराठे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशसेवेचा वसा स्वीकारलेल्या कुद्रेमानी गावातील या नऊ जणांची कामगिरी ग्रामीण भागातील युवक-युवतींसाठी प्रेरणादायी ठरत असून, गावात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.





