बेळगाव लाईव्ह : कॉम्रेड कृष्णा मेणसे पुरस्कार समिती बेळगाव यांच्यातर्फे कॉ. कृष्णा मेणसे स्मृति पुरस्कार वितरण समारंभ येत्या मंगळवार दि. 13 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
ज्येष्ठ नेते कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचा पहिला स्मृती दिन साजरा करण्यात येत असून यानिमित्ताने कॉ. कृष्णा मेणसे यांच्या नावे दरवर्षी दोन कर्तुत्ववान व्यक्तींना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला जाणार आहे.
त्या अनुषंगाने यंदा पहिल्या वर्षी आयटक कामगार महासंघाच्या राष्ट्रीय महासचिव कॉ. अमरजीत कौर आणि बेळगावचे कुस्ती प्रशिक्षक पै. मारुती घाडी यांना कॉ. कृष्णा मेणसे स्मृती पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात येणार आहे.
तसेच बेळगावचे गांधीवादी कार्यकर्ते शिवाजी कागणीकर यांना मानद डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. मराठा मंदिर, खानापूर रोड, रेल्वे ओव्हर ब्रिज जवळ बेळगाव येथे या पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
भाकप राष्ट्रीय सचिव मंडळाचे सदस्य पत्रकार व लेखक कॉम्रेड भालचंद्र कांगो यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूरचे महाराष्ट्र केसरी पै. विष्णू जोशीलकर उपस्थित राहणार आहेत. तरी हितचिंतकांसह नागरिकांनी या समारंभास बहुसंख्येने उपस्थित राहून शोभा वाढवावी, असे जाहीर निमंत्रण कॉम्रेड कृष्णा मेणसे पुरस्कार समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर व सेक्रेटरी माजी प्राचार्य आनंद मेणसे यांनी दिले आहे.




