बेळगाव लाईव्ह : खानापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकात १२ जानेवारी रोजी तालुका समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. १७ जानेवारी रोजी होणाऱ्या हुतात्मा दिनाच्या नियोजनासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सीमाभागातील पहिले हुतात्मा नागाप्पा होसुरकर यांना अभिवादन करण्यासाठी सीमावासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या बैठकीला युवा समितीचे सीमाभाग कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सीमाप्रश्नाबाबत विरोधी भूमिका घेणाऱ्या शिवसेना शिंदे गटाची बेळगाव जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच शुभम शेळके यांच्यावर कानडी संघटनांनी प्रशासनामार्फत आणलेल्या दबावाबाबतही सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली.
युवा समितीच्या वतीने काढण्यात येणाऱ्या ‘मराठी सन्मान यात्रे’ला पूर्ण सहकार्य करण्याचा निर्णय समितीने घेतला. जे सहकारी सध्या वेगळे होऊन काम करत आहेत, त्यांनी पुन्हा मुख्य प्रवाहात येऊन एकजूट दाखवावी, असे आवाहन नेत्यांनी केले. मध्यवर्ती समितीला विश्वासात घेऊन एकदा दिल्लीत धडक देऊया, असा विश्वास दिगंबर पाटील यांनी व्यक्त केला.

आबासाहेब दळवी यांनी धनंजय पाटील यांचे अभिनंदन करत, सर्वांनी एकदिलाने चळवळ अबाधित राखण्याचे आवाहन केले. दरम्यान, मुरलीधर पाटील यांनी महाराष्ट्रातील नेत्यांच्या भूमिकेवर टीका करत, सीमाभाग महाराष्ट्रात हवा की नको हे स्पष्ट करण्याचे आव्हान दिले. पत्रकार दिनकर मरगाळे व विवेक गिरी यांनी सुरू केलेल्या रस्त्यांच्या कामाविरोधी उपोषणालाही बैठकीत पाठिंबा दर्शवण्यात आला.
हुतात्मा दिनाच्या जनजागृतीसाठी मंगळवारी जांबोटी, बुधवारी नंदगड आणि शुक्रवारी कणकुंबी येथे बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार १७ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजता खानापूर येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार आहे.





