बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) नगरपंचायतीला दोन वेळा नोटीस बजावूनही राजा शिवछत्रपती चौक ते मरिअम्मा मंदिर दरम्यान नव्याने होणाऱ्या रस्त्याच्या कामात अडथळा ठरत असलेली अतिक्रमणे हटविण्यात नगरपंचायतीकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप माजी नगरसेवक दिनकर मरगाळे व विवेक गिरी यांनी केला आहे.
चार दिवसांत अतिक्रमणे हटविण्यात यावीत, अन्यथा नगरपंचायतीसमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा त्यांनी यापूर्वी दिला होता. मात्र अद्यापही अतिक्रमणे हटविण्यात आलेली नसल्याने मंगळवार, दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता नगरपंचायतीसमोर आमरण उपोषणास सुरुवात करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते सुरेश जाधव यांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष कुरबेट यांच्याकडे विचारणा केली असता, नगरपंचायतीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्याचे मार्किंग करण्याबाबत पत्र देण्यात आले असून, पीडब्ल्यूडीकडून मार्किंग झाल्यानंतर पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणे हटविण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सोमवारी रस्त्याच्या मध्यभागापासून दोन्ही बाजूंना प्रत्येकी दहा मीटरचे मार्किंग करण्यात येणार असून, त्यानंतर अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात येईल, असेही जाधव यांना सांगण्यात आले आहे.
तसेच रस्त्याच्या कामात कोणताही राजकीय हस्तक्षेप झाल्यास, हस्तक्षेप करणाऱ्या राजकीय नेत्यांचे प्रतीकात्मक पुतळे दहन करण्याचा इशारा खानापूर शहरातील नागरिकांनी दिला आहे.
रस्त्यामधील अतिक्रमणे तात्काळ हटविण्यात यावीत, या मागणीसाठी माजी नगरसेवकांच्या आंदोलनाला समितीचे नेते व कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. ईश्वर घाडी, समितीचे नेते प्रकाश चव्हाण यांच्यासह भारतीय जनता पार्टीतील अनेक नेते, तसेच खानापूर शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनीही पाठिंबा जाहीर केला आहे.
यासंदर्भात माजी नगरसेवक दिनकर मरगाळे व विवेक गिरी यांनी नगरपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभागाला स्पष्ट इशारा देत, सोमवार, दिनांक 12 जानेवारी 2025 पर्यंत अतिक्रमणे हटविण्यात आली नाहीत, तर मंगळवार, दिनांक 13 जानेवारी 2025 पासून आमरण उपोषणास सुरुवात करण्यात येईल, असे ठामपणे सांगितले आहे.




