बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुक्यातील नंदगड येथे क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या ऐतिहासिक स्मारकाचे लोकार्पण आणि भव्य पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते थाटामाटात पार पडले. या सोहळ्यासाठी हजारो नागरिकांची उपस्थिती होती, मात्र कार्यक्रमाच्या मुख्य मंचावर जे राजकीय नाट्य रंगले, त्याचीच चर्चा आता संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे. हा सोहळा केवळ विकासकामांच्या उद्घाटनापुरता मर्यादित न राहता, वादाच्या घडामोडींचा सोहळा ठरल्याची चर्चा सुरु आहे.
कार्यक्रमाची सुरुवातच काहीशा तणावात झाली होती. खानापूरच्या आमदारांच्या भाषणावरून झालेला गदारोळ शांत होतो न होतो, तोच मंचावर ‘ताईं’चा पारा चढल्याचे पाहायला मिळाले. मंचावर एका निलंबित युवा कार्यकर्त्याला पाहून ताई प्रचंड संतापल्या. “ज्या कार्यकर्त्यावर पक्षाने निलंबनाची कारवाई केली आहे, तो सरकारी मंचावर आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काय करतोय?” असा परखड सवाल ताईंनी उपस्थित केला. त्यांनी याच मुद्द्यावरून अक्कांच्या आमदार बंधूंना सुनावले.
ताईंचा हा आक्रमक पवित्रा पाहून मंचावर उपस्थित असलेल्या ‘आक्कांनी’ तात्काळ प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. आपल्या भावाची बाजू सावरून धरतानाच अक्कांनी ताईंच्या आक्षेपांना उत्तर दिले. यातूनच ताई आणि अक्का यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. दोघीही आपल्या भूमिकेवर ठाम होत्या आणि एकमेकींवर शब्दांचे वार-पलटवार करत होत्या. मंचावर उपस्थित असलेले मुख्यमंत्री आणि इतर वरिष्ठ नेते हा प्रकार पाहून काही काळ चकीत झाले.
दोन्ही नेत्यांमधील हा संघर्ष वाढत असल्याचे पाहून अखेर वरिष्ठांनी पुढाकार घेतला. दोन्ही बाजूंची समजूत काढत हा वाद तिथेच थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. अखेर काही वेळानंतर वातावरण निवळले, पण तोपर्यंत या शाब्दिक युद्धाच्या बातम्या वाऱ्यासारख्या जिल्हाभर पसरल्या होत्या. संगोळ्ळी रायण्णा यांच्या अभिवादन सोहळ्यात ‘ताई’ आणि ‘अक्का’ यांच्यातील ही जुगलबंदीच नागरिकांच्या चर्चेचा मुख्य विषय ठरली.
एकूणच खानापूरच्या ताईंच्या होम ग्राऊंड वर आक्काच्या बंधूची बॅटिंगसाठी नजर असल्यानेच की काय ताईनी अक्का ना खडे बोल सुनावले अशी चर्चा रंगली होती.





