बेळगाव लाईव्ह: खानापूर व बेळगाव तालुक्याच्या सीमावर्ती भागातील काही गावांमध्ये 8 ते 9 हत्तींच्या कळपाने संचार करत असल्याचे वन विभागाच्या निदर्शनास आले आहे. नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेच्या दृष्टीने उप वनसंरक्षण अधिकारी, बेळगाव विभाग यांच्या वतीने संबंधित गावांना तातडीचा इशारा देण्यात आला आहे.
संबंधित गावे :
बाकनुर, बेळवट्टी, बैलूर, कुसमळी, किणये, हब्बनट्टी व देवाचीहट्टी,धारोळी, कब्बनली, निलावडे, आंबोळी , भांदेकरवाडाया गावांमध्ये गवा रेड्यांचा वावर आढळून आला आहे.
वन विभागाच्या माहितीनुसार सायंकाळी ६ ते सकाळी ८ या वेळेत हत्तींच्या संचार अधिक असतो. त्यामुळे या वेळेत नागरिकांनी जंगलालगतच्या भागात किंवा शेतजमिनीवर एकट्याने जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हत्ती दिसल्यास त्यांना चिथावणी देऊ नये. दगडफेक, आरडाओरड करणे किंवा मोबाईल फ्लॅश लावून फोटो काढण्याचा प्रयत्न केल्यास प्राणी आक्रमक होऊन हल्ला करण्याची शक्यता असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.
शेतजमिनीभोवती बेकायदेशीर विद्युत कुंपण घालणे हा दंडनीय गुन्हा असून, अशा प्रकारामुळे प्राणी तसेच मानवी जीविताला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे.

अत्यावश्यक परिस्थितीत बाहेर पडताना नागरिकांनी गटाने चालावे व आवाज करत पुढे जावे, असेही सूचित करण्यात आले आहे.
दरम्यान, वन विभागाने तातडीची प्रतिसाद पथके (RRT) व अतिरिक्त कर्मचारी तैनात केले असून, गवा रेड्यांच्या हालचालींवर २४ तास लक्ष ठेवण्यात येत आहे. हत्तीना सुरक्षितरीत्या जंगलात परत पाठवण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली असल्याची माहिती वन विभागाने दिली.
आपल्या परिसरात हत्ती आढळून आल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या वन कार्यालयाशी किंवा बेळगाव वन नियंत्रण कक्ष (१९२६) तसेच क्षेत्रीय वन अधिकारी, खानापूर (८१०५३४४३०८) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




