belgaum

रस्ताच ठरला मृत्यूचा सापळा!

0
905
 belgaum

बेळगाव लाईव्ह :खानापूर–लोंढा महामार्गावरील अर्धवट व निष्काळजी चौपदरीकरणाचा आणखी एक बळी गेला असून, सरकारी यंत्रणा आणि कंत्राटदारांच्या बेपर्वाईमुळे एका तरुणाचा निष्पाप जीव हिरावला गेला आहे. कोणतीही सूचना, सुरक्षा साधने किंवा प्रकाश व्यवस्था नसलेल्या ठिकाणी रस्त्यावर थांबवलेल्या डिव्हायडरमुळे दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी रात्री घडली.

वरकड गवळीवाडा (ता. खानापूर) येथील बाबू खरात हा युवक शुक्रवार, दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून जात असताना लोंढा रेल्वे गेटपासून अवघ्या 100 मीटर अंतरावर रस्त्यावर आडवे उभे असलेले डिव्हायडर त्याच्या लक्षात न आल्याने त्याने जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला आणि बाबू खरात याचा जागीच मृत्यू झाला.

महामार्गाच्या या भागात चौपदरीकरणाचे काम अर्धवट अवस्थेत असून, काही ठिकाणी रस्ता अचानक वळवण्यात आला आहे. मात्र, वेगात येणाऱ्या वाहनचालकांना याची कोणतीही पूर्वकल्पना मिळावी यासाठी आवश्यक असलेले सूचना फलक, रिफ्लेक्टर, रेडियम पट्टे किंवा स्ट्रीट लाईट्स यापैकी काहीही बसवण्यात आलेले नाही. विशेषतः रात्रीच्या वेळी हा परिसर पूर्णपणे अंधारात असल्याने रस्ता ओळखणे अशक्य होत आहे.

 belgaum


या अपघाताचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार हेब्बाळ (ता. खानापूर) येथील सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ केसरेकर असून, त्यांनी तातडीने पोलिसांना व रुग्णवाहिकेला माहिती दिली. युवकाला खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याचा मृत्यू घटनास्थळीच झाल्याचे घोषित केले.


या घटनेमुळे महामार्ग प्रकल्पाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “काम पूर्ण नसेल तर किमान नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी तरी कोणाची?” असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. कोणतीही खबरदारी न घेता रस्त्यावर डिव्हायडर ठेवणे म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे असल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.


या प्रकरणी संबंधित कंत्राटदार तसेच जबाबदार शासकीय अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा (culpable homicide) दाखल करावा, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना आणि वाहनचालकांकडून होत आहे. यापूर्वीही याच महामार्गावर अशाच प्रकारच्या निष्काळजीपणामुळे अपघात घडल्याचे निदर्शनास आणले जात असून, प्रशासनाने तात्काळ पावले उचलली नाहीत तर आणखी जीव जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


चौपदरीकरणाचा प्रकल्प विकासासाठी असला तरी तो नागरिकांच्या जीवावर बेतत असेल, तर अशा ‘विकासाला’ अर्थ काय, असा संतप्त सवाल आज खानापूर परिसरात सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.