बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्ह्यातील कडोली गावाचा युवा ज्युडोपटू व DYES क्रीडा वसतिगृह, बेळगावचा विद्यार्थी श्लोक कातकर याने पंजाबमधील लुधियाना येथे पार पडलेल्या ६९ व्या शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत –२५ किलो वजनगटात कांस्यपदक पटकावत कर्नाटक व बेळगाव जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.
ही स्पर्धा ५ ते १० जानेवारी २०२६ दरम्यान पार पडली.
१२ वर्षीय श्लोक काटकरने कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करताना पहिल्या फेरीत ‘बाय’ मिळवला. दुसऱ्या लढतीत त्याने छत्तीसगडच्या साहू कुणाल याचा इप्पॉनद्वारे पराभव केला.त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत चंदीगडच्या साहिल याच्यावर मात करत त्याने आपल्या तंत्रकौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.
उपांत्य फेरीत श्लोकची लढत राजस्थानच्या अभिषेक सैनी याच्याशी झाली. अत्यंत चुरशीच्या या लढतीत एका किरकोळ चुकीमुळे श्लोकला पराभव स्वीकारावा लागला. मात्र, हार न मानता कांस्यपदकाच्या लढतीत त्याने जबरदस्त पुनरागमन करत जम्मू–काश्मीरच्या सौरव सिंग याला वाझारी व इप्पॉनद्वारे पराभूत करून कांस्यपदकावर आपले नाव कोरले.
श्लोक कातकर सध्या बेळगाव येथील जिल्हा स्टेडियममधील ज्युडो हॉलमध्ये एनआयएस ज्युडो प्रशिक्षक रोहिणी पाटील व कुतुजा मुलतानी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. त्याच्या या यशामागे शिस्तबद्ध सरावासोबतच उपसंचालक श्रीनिवास बी. यांचे मोलाचे मार्गदर्शन व सातत्यपूर्ण पाठबळ लाभले आहे.

श्लोकच्या या यशामुळे कडोली गाव, DYES क्रीडा वसतिगृह बेळगाव तसेच संपूर्ण जिल्ह्याला अभिमान वाटत असून, परिसरातील ज्युडो क्रीडा क्षेत्राची वाढती ताकद व उज्ज्वल भविष्य अधोरेखित झाले आहे.





