बेळगाव लाईव्ह : बेंगळुरू येथील अधिवेशनात काँग्रेसने राज्यपालांसोबत केलेले वर्तन म्हणजे लोकशाहीचा खून असल्याची घणाघाती टीका खासदार ईरण्णा कडाडी यांनी केली आहे. राज्यपालांना सन्मानाने निरोप देण्याऐवजी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी त्यांना घेराव घालून अभूतपूर्व गोंधळ घातल्याचा आरोप त्यांनी केला.
बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत कडाडी यांनी काँग्रेसच्या दुटप्पी धोरणावर सडकून टीका केली. १९८० पासून सुरू असलेल्या रोजगार योजनांचे श्रेय काँग्रेस लाटत आहे, मात्र प्रत्यक्षात ‘नरेगा’च्या माध्यमातून काँग्रेस नेत्यांनी केवळ स्वतःचे खिसे भरण्याचे काम केले, असा आरोप ईरण्णा कडाडी यांनी केला. केंद्र सरकार गरिबांना रोजगार देतेय, पण काँग्रेसला त्यात केवळ राजकारण दिसत आहे, असे ईरण्णा कडाडी यांनी म्हटले.
जिल्हा विभाजनाच्या मुद्द्यावर बोलताना कडाडी यांनी प्रशासकीय सोयीसाठी बेळगाव जिल्ह्याचे पाच जिल्ह्यांत विभाजन करण्याची मागणी रेटून धरली. ५० लाख लोकसंख्येच्या या अवाढव्य जिल्ह्याबाबत सरकारने आयोगाच्या अहवालावर कारवाई करावी, असे आवाहन ईरण्णा कडाडी यांनी दिले.
राज्यात काँग्रेसची गुंडप्रवृत्ती बळावली असून अधिवेशनातील घटना त्याचेच ज्वलंत उदाहरण आहे, असे ईरण्णा कडाडी यांनी नमूद केले.
यावेळी भाजप शहराध्यक्षा गीता सुतार, मनपा सभागृह नेते हनुमंत कोंगाळी यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.





