बेळगाव लाईव्ह :जनता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जनता विद्यालय, तुर्केवाडी येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षेच्या पार्श्वभूमीवर ‘परीक्षेला सामोरे जाताना…’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानात ‘भरळ’ कथासंग्रहाचे लेखक गुणवंत पाटील यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव जी. एन. पाटील होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून विद्यालयाचे माजी विद्यार्थी व पत्रकार प्रसाद प्रभू उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक ए. के. नाईक आणि पर्यवेक्षक एस. ए. पाटील यांनी केले.
इयत्ता दहावीचे विद्यार्थी फेब्रुवारी महिन्यात बोर्ड परीक्षेला सामोरे जात असल्याने त्यांना योग्य दिशा व आत्मविश्वास देण्यासाठी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या मार्गदर्शनात गुणवंत पाटील यांनी सांगितले की, “आयुष्यात आपण जे काही शिकतो तेच आपली ओळख ठरवत असते. पूर्वीची शिक्षणपद्धती स्मरणशक्तीवर आधारित होती, मात्र आजची परीक्षा पद्धती आकलनावर आधारित आहे.
वर्गात नियमित उपस्थित राहिल्यास आपला ८० टक्के अभ्यास पूर्ण होतो. परीक्षेला आत्मविश्वासाने आणि धाडसाने सामोरे जाण्यासाठी पूर्वतयारी अत्यंत महत्त्वाची आहे. आपण जे काम करतो ते उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुस्तकं आणि शिक्षकांचे आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. व्यवहारज्ञानही तितकेच आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी नेहमी विद्यार्थ्यासारखेच वागावे आणि शिकण्याची वृत्ती जपावी. तसेच परीक्षेला सामोरे जाताना अगदी लहानसहान गोष्टींचीही काळजी घेणे गरजेचे आहे.”

यावेळी प्रमुख उपस्थित पत्रकार प्रसाद प्रभू यांनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा दिला. “या शाळेने मला घडवले. वक्तृत्व स्पर्धा आणि येथील शिक्षकांचे मार्गदर्शन माझ्या जडणघडणीत अत्यंत महत्त्वाचे ठरले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात जनता विद्यालयाची भूमिका मोलाची आहे,” असे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी विद्यालय व संस्थेच्या वतीने गुणवंत पाटील आणि प्रसाद प्रभू यांचा शाल, पुष्प, सन्मानचिन्ह व विद्यालयाची स्मरणिका देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच मराठी विषयाचे अध्यापक व लेखक बी. एन. पाटील यांनी आपली ‘गावाकडची माती’ आणि ‘राखण’ ही दोन पुस्तके गुणवंत पाटील यांना भेट म्हणून दिली.
कार्यक्रमात मुख्याध्यापक ए. के. नाईक यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास विद्यालयातील सर्व अध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन बी. एन. पाटील यांनी केले तर आभार एस. ए. पाटील यांनी मानले.




