बेळगाव लाईव्ह :अमर रहे अमर रहे हुतात्मे अमर रहे, बेळगाव-कारवार-निपाणी-बिदर-भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, रहेंगे तो महाराष्ट्र मे नही तो जेल में, अशा घोषणा देत महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्राणाची आहुती दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आज शनिवारी सकाळी बेळगाव शहरात गांभीर्याने पार पडला.
शहरातील हुतात्मा चौकामध्ये आज सकाळी आयोजित सदर कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक झाल्यानंतर मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समिती, बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेतर्फे सीमा लढ्यातील हुतात्म्यांना पुष्पहार व पुष्पचक्र अर्पण करून करण्यात आले. प्रारंभी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे ज्येष्ठ सदस्य राजाभाऊ पाटील यांनी दीप प्रज्वलित करण्याबरोबरच हुतात्म्यांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करून नमन केले. त्यानंतर मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, शहर म. ए. समितीचे अध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील, नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर, वैशाली भातकांडे,माजी महापौर सरिता पाटील, रमाकांत कोंडुसकर, शुभम शेळके, माजी नगरसेवक नेताजी जाधव, प्रकाश मरगाळे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश शिरोळकर, ॲड. अमर येळ्ळूरकर, आप्पासाहेब गुरव, बापू जाधव, मदन बामणे, ॲड. महेश बिर्जे, माजी उपमहापौर ॲड. धनराज गवळी आदींनी हुतात्म्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. अभिवादनाच्या कार्यक्रमानंतर शहरात मुकफेरी काढण्यात आली.
हुतात्मा चौकातून प्रारंभ झालेली ही मुकफेरी रामदेव गल्ली, खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, अनुसुरकर गल्ली, किर्लोस्कर रोड मार्गे पुन्हा हुतात्मा चौकात येथे समाप्त झाली. सदर फेरीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या म. ए. समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह मराठी भाषिकांनी अमर रहे अमर रहे हुतात्मे अमर रहे, बेळगाव-कारवार-निपाणी-बिदर-भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, रहेंगे तो महाराष्ट्र मे नही तो जेल में वगैरे घोषणा देऊन मार्ग दणाणून सोडला होता. अखेर हुतात्मा चौकात या मुकफेरीचे सभेत रूपांतर झाले.
सभेमध्ये बोलताना राजाभाऊ पाटील यांनी भाषावार प्रांतरचनेवेळी केंद्र सरकारने महाराष्ट्रावर जो अन्याय केला आहे, त्याच्याविरुद्ध संयुक्त महाराष्ट्र समिती आणि महाराष्ट्र एकीकरण समिती आजपर्यंत लढत आहेत. या लढ्याचा अर्धा भाग यशस्वी झाला आहे असे सांगून तो कसा यशस्वी झाला याची थोडक्यात माहिती त्यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्राला जोडल्याखेरीज सीमा लढा थांबणार नाही आणि त्याकरिता शपथबद्ध होण्याकरिता आपण हा हुतात्मा दिन आजतागायत पाळत आलो आहोत. या प्रश्नाच्या सोडवणुकीच्या दृष्टीने आपण आता थोडी प्रगती केली आहे असे म्हंटल्यास वावगे ठरू नये. आजपर्यंत कधी झालं नव्हतं ते महाराष्ट्र सरकारने गेल्या चार वर्षापासून हा प्रश्न आपला मानला आहे. महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात जी याचिका दाखल केली आहे त्यात “महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्न पुन्हा भारताच्या संसदेकडे पाठवून देण्यात यावा आणि जो काही निर्णय व्हायचा आहे तो संसदेत होऊ दे,” अशी अगदी साधी मागणी करण्यात आली आहे.

मात्र अजूनही ती मागणी मान्य झालेली नसून ती मान्य होईपर्यंत आपल्याला हा लढा चालू ठेवावा लागेल. मागणी मान्य झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात किंवा संसदेत जो काही युक्तिवाद करायचा आहे तो आपल्याला करता येईल आणि हे घडेपर्यंत आपल्यातील गेल्या 70 वर्षांपासून असलेले अभेद्य ऐक्य यापुढेही आपण कायम ठेवून या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहूया, असे राजाभाऊ पाटील शेवटी म्हणाले. याप्रसंगी रणजीत चव्हाण -पाटील यांच्यासह उपस्थित नेते मंडळींनी समायोचित विचार मांडले.
यावेळी सर्वच वक्त्यांनी आपल्या भाषणात समस्त मराठी भाषिकांच्यावतीने जोपर्यंत बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्रात विलीन होत नाही तोपर्यंत त्यासाठीचा लढा पुढे सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे दरवर्षी 17 जानेवारी रोजी हुतात्मा अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पाडला जातो. आज देखील तो शांततेत पार पाडण्यात आला असला तरी पोलीस प्रशासनाकडून हुतात्मा चौक आणि परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.





