बेळगाव लाईव्ह :हिरेबागेवाडी येथील धारवाड बसस्टँड जवळील दुकान फोडून 12 हजार रुपये लंपास केल्याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलिसांनी काल हुबळी येथील दोन महिलांसह तिघा जणांना अटक केली असून त्यांच्या जवळून ऑटो रिक्षासह रोख 8000 रुपये असा सुमारे 3 लाख 58 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे योगेश कृष्णप्पा राव (वय 40, मूळ रा. बॅडरहळी बेंगळूर उत्तर, सध्या रा. सदाशिवनगर हुबळी), सावित्री कृष्णा वज्जन्नावर (वय 39) आणि जानकी बसवराज शेट्टेन्नावर (वय 51, दोघी रा. शिवशंकर कॉलनी, जुने हुबळी) अशी आहेत. हे तिघेही जण ऑटो रिक्षातून (क्र. केए 02 एके 7065) संकेश्वरला गेले होते.
तेथून परत हुबळीला जात असताना हिरेबागेवाडी येथील धारवाड बस स्टँड जवळील एक दुकान फोडून त्यांनी 12 हजार रुपयांची रोकड पळविली होती. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच हिरे बागेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. के. होळेन्नावर यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने त्वरेने तपास लावून उपरोक्त आरोपींना ताब्यात घेतले.
तसेच त्यांच्या जवळील 8 हजार रुपयांची रोख रक्कम, एटीएम कार्ड आणि चोरी करताना वापरलेली सुमारे 3 लाख 50 हजार रुपये किमतीची ऑटोरिक्षा असा एकूण 3 लाख 58 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.





