बेळगाव लाईव्ह : आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघातर्फे (इस्कॉन) आयोजित २८ व्या ‘हरे कृष्ण’ रथयात्रेने शनिवारी बेळगाव शहर कृष्णमय झाले. फुलांनी सजवलेला रथ, टाळ-मृदंगांचा गजर आणि ‘हरे कृष्ण’ महामंत्राच्या जयघोषात हजारो भाविकांनी या भक्ती सोहळ्यात सहभाग नोंदवला.
धर्मवीर संभाजी महाराज चौकात राज्यसभा खासदार ईरण्णा कडाडी आणि नगरसेवक जयतीर्थ सवदत्ती यांच्या उपस्थितीत श्रीफळ अर्पण करून या यात्रेला अधिकृत सुरुवात करण्यात आली. फुलांनी सजवलेल्या रथात भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांच्यासह राधा-कृष्ण, नित्यानंद महाप्रभू आणि गौरांग महाप्रभूंच्या मूर्ती विराजमान होत्या. यावेळी पुरुषांनी डाव्या बाजूने आणि महिलांनी उजव्या बाजूने दोर ओढून भक्तीभावाने रथाला मार्गस्थ केले.
या रथयात्रेमध्ये मंजिरी बेनके यांच्या नेतृत्वाखालील ३० युवतींच्या पथकाने काढलेल्या आकर्षक रांगोळ्या आणि २० सुशोभित बैलगाड्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रथासोबतच भीष्म शरशय्या, नृसिंह देव, कालिया मर्दन यांसारख्या श्रीकृष्णाच्या विविध लीलांचे दर्शन घडवणारे देखावे सादर करण्यात आले होते. लहान मुलांना अध्यात्माची रुची निर्माण व्हावी यासाठी भगवद्गीतेवर आधारित विविध चित्ररथही यात्रेत सहभागी झाले होते.

इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य भक्तिरसामृत स्वामी महाराज, सुंदर चैतन्य महाराज आणि वृंदावनचे ब्रजेश चंद्र गोस्वामी प्रभू यांनी भाविकांना आशिर्वचन दिले. ही यात्रा धर्मवीर संभाजी चौकातून सुरू होऊन कॉलेज रोड, समादेवी गल्ली, खडेबाजार, शनिवार खूट, गणपत गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, रामलिंगखिंड गल्ली, पाटील गल्लीमार्गे शहापूर येथील इस्कॉन मैदानावर संपन्न झाली. संपूर्ण मार्गावर ५० हजारांहून अधिक महाप्रसाद पाकिटांचे तसेच पाणी, सरबत आणि फळांचे वाटप करण्यात आले.
यंदाच्या रथयात्रेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे भक्तांनी दिलेला स्वच्छतेचा संदेश. रथ पुढे सरकल्यानंतर मागे पडलेले प्लास्टिकचे ग्लास आणि इतर कचरा भाविकांनी स्वतःहून गोळा केला. कडाक्याच्या उन्हातही भक्तीबरोबर स्वच्छतेचा हा नवा आदर्श बेळगावकरांच्या चर्चेचा विषय ठरला.





