बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील फोर्ट रोड येथील मॅजेस्टिक हॉटेल समोरील कोपऱ्यावर मोठ्या प्रमाणात साचलेला कचऱ्याचा ढिगारा तात्काळ हटवण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
फोर्ट रोड येथील मॅजेस्टिक हॉटेल समोरील कोपऱ्यावर अलीकडे परिसरातील रहिवासी, दुकानदार आणि व्यावसायिकांकडून सातत्याने कचरा टाकला जात आहे.
या कचऱ्याची वेळच्यावेळी उचल होत नसल्यामुळे तो कित्येक दिवस साचून राहत आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छतेसह दुर्गंधी निर्माण होत आहे. बऱ्याचदा ही अस्वच्छता रस्त्यावर पसरत असल्यामुळे पादचाऱ्यांची रस्त्यावरून ये -जा करताना गैरसोय होत असते. सध्या देखील तीच परिस्थिती असून या कोपऱ्यावर कचरा भरलेल्या प्लास्टिक पिशव्या, पोती आणि अन्य टाकाऊ साहित्य यांचा मोठा ढिगारा निर्माण झाला असून कचरा रस्त्यावर येऊ लागला आहे.
तरी या भागाच्या नगरसेवकांसह महापालिकेच्या स्वच्छता विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर कचऱ्याचा ढीग तात्काळ हटवावा. त्याचप्रमाणे या ठिकाणी कचरा फेकला जाणार नाही किंवा या ठिकाणच्या कचऱ्याची वेळच्यावेळी उचल होईल या दृष्टीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.




