बेळगाव लाईव्ह :भेंडीगिरी (ता. जि. बेळगाव) येथील बस स्थानकाजवळ सार्वजनिक ठिकाणी बेकायदा दारू विक्री करणाऱ्या एकाला हिरेबागेवाडी पोलिसांनी अटक करून त्याच्याकडील 1,500 रुपये किमतीची दारूची पाकिटे जप्त केली.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव नागराज सुरेश नडवीनमनी (वय 33, संगोळ्ळी रायण्णा सर्कलनजीक भेंडीगिरी बेळगाव) असे आहे. नागराज हा काल बुधवारी आपल्या गावातील बस स्थानकाजवळ बेकायदेशीररित्या दारूची बेकायदेशीर विक्री करत असताना हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बसवराज के. मिटगार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह धाड टाकून नागराज याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्या जवळील 1,500 रुपये किमतीची ग्रीन चॅम्पियन कंपनीची प्रत्येकी 90 मिली मापाची 30 पाकिटे जप्त केली. याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
बेळगाव शहरात सार्वजनिक ठिकाणी गांजा या अंमली पदार्थाच्या नशेत विचित्र वर्तन करणाऱ्या दोघा युवकांना काल गुरुवारी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा नोंदवला.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे रोहित रवी लोखंडे (वय 19, रा. मातंगी कॉलनी काळी अमराई, बेळगाव) आणि अर्फत सलीम बेपारी (वय 26, रा. काकर स्ट्रीट कॅम्प, बेळगाव) अशी आहेत. या दोघांपैकी रोहित हा युवक बेळगाव कोर्ट आवारालगतच्या बोळाजवळ सार्वजनिक ठिकाणी विचित्र वर्तन करत असल्याचे निदर्शनास येताच खडेबाजार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आनंद अदगोंड व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने कोणतीतरी नशा केल्याचे दिसून आले. त्यानंतर वैद्यकीय तपासणीत रोहित याने बंदी असलेल्या गांजा या अंमली पदार्थाचे सेवन केल्याचे स्पष्ट झाल्याने त्याच्यावर खडेबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत कॅम्प येथील चर्च स्ट्रीट येथे सार्वजनिक ठिकाणी नशेमध्ये विचित्र वागणाऱ्या अर्फत बेपारी याला कॅम्प पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक ए. रुक्मिणी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी करवली. त्यावेळी त्याने गांज सेवन केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
तलवारीसह दहशत निर्माण करणारा युवक गजाआड
जुने गांधीनगर, बेळगाव येथे सार्वजनिक ठिकाणी स्वतःजवळ प्राणघातक शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या एका युवकाला माळमारुती पोलीस ठाण्याच्या अँटी स्टॅबिंग पथकाने काल अटक करून त्याच्याकडील धारदार तलवार जप्त केली.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव मोहम्मद राजेसाहेब शेख (वय 30, रा. गोकुळ गल्ली जुने गांधीनगर, बेळगाव असे आहे. तीक्ष्ण हत्याराने भोसकाभोसकीच्या शहरातील वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांची अँटी स्टॅबिंग पथके स्थापण्यात आली आहेत. त्यापैकी माळमारुती पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक होन्नप्पा तळवार यांच्या नेतृत्वाखालील अँटी स्टॅबिंग पथक काल बुधवारी संशयितांची तपासणी करण्याच्या मोहिमेवर होते. त्यावेळी त्यांनी गोकुळ गल्ली जवळील रेल्वे मार्गाशेजारी सार्वजनिक ठिकाणी संशयास्पदरित्या वावरणाऱ्या मोहम्मद याला अडवून चौकशी करण्याबरोबरच त्याची झडती घेतली. तेंव्हा दहशत माजवण्याच्या अथवा एखादी हिंसक कृती करण्यासाठी त्याने स्वतःजवळ धारदार तलवार बाळगल्याचे आढळून आले. पोलिसांनी ती तलवार जप्त करण्याबरोबरच माळमारुती पोलीस ठाण्यात मोहम्मद शेख यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.





