बेळगाव लाईव्ह:बेळगाव एपीएमसी मार्केट यार्डजवळ पोलीस कारवाईच्या दोन प्रकरणांमध्ये सार्वजनिक ठिकाणी मटका जुगार खेळणाऱ्या 6 जणांना काल मंगळवारी एपीएमसी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या जवळील एकूण रोख 19,602 रुपयांसह जुगाराचे साहित्य जप्त केले.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे विनायक विजेशकुमार कोलकार (वय 19, रा. रामनगर तिसरा क्रॉस, कंग्राळी खुर्द), किरण सुरेश भजंत्री (वय 27, रा. कंग्राळी खुर्द, सागरनगर बेळगाव), मारुती भरमा रजाई (वय 31, रा. कंग्राळी खुर्द, बेळगाव), अनुप महादेव कंबीर (वय 47, रा. एपीएमसी मार्केट यार्ड, कंग्राळी खुर्द बेळगाव) आणि विनायक मोतीराम सोनारवाडी (वय 41, रा. ज्योतीनगर मार्केट यार्ड, कंग्राळी खुर्द बेळगाव) अशी आहेत.
यापैकी विनायक कोलकार हा काल मंगळवारी बेळगाव एपीएमसी मार्केट यार्ड जवळ सार्वजनिक ठिकाणी ओसी मटका जुगार खेळत असताना एपीएमसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जी. एल. कोटबागी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धाड टाकून विनायक याला ताब्यात घेतले तसेच त्याच्या जवळील रोख 1000 रुपये आणि मटक्याचे अंक लिहिलेल्या चिठ्ठ्या जप्त केल्या.
दुसऱ्या घटनेत उपरोक्त इतर पाच आरोपी हे देखील एपीएमसी मार्केट यार्ड जवळ अन्य एका ठिकाणी पैसे लावून मटका जुगार खेळत होते.
त्यावेळी एपीएमसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस. आर. मुत्तट्टी व त्यांच्या सहकार्याने धाड टाकून सर्व आरोपींना ताब्यात घेतले तसेच त्यांच्या जवळील रोख 18,602 रुपये आणि मटक्याचे अंक लिहिलेल्या चिठ्ठ्या जप्त केल्या. या दोन्ही प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.




