बेळगाव लाईव्ह : पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने सेंट पॉल्स इन्स्टिट्यूशन्स, बेळगाव आणि सेंट पॉल्स इन्स्टिट्यूशन्सच्या पालक-शिक्षक संघटनेच्या (पीटीए) संयुक्त विद्यमाने रविवार दि. 11 जानेवारी 2026 रोजी सकाळी 6 वाजता “पर्यावरण – गो ग्रीन” मॅरेथॉन 2026 शर्यतीचे दुसरे पर्व सेंट पॉल्स हायस्कूल मैदान, बेळगाव येथे आयोजित करण्यात येत आहे.
“ग्रीन सिटी, क्लीन सिटी – चला आपल्या स्वप्नातील शहरासाठी धावूया!” या प्रेरणादायी संकल्पनेतून ही मॅरेथॉन आयोजित करण्यात येत असून पर्यावरण संरक्षण, निरोगी जीवनशैली आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग याबाबत जागृती निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ‘पर्यावरण’ ही केवळ स्पर्धा नसून स्वच्छ व हरित बेळगाव घडवण्यासाठी नागरिकांना एकत्र आणणारी एक चळवळ आहे.
या मॅरेथॉनमध्ये 3 कि.मी., 5 कि.मी. आणि 10 कि.मी. अशा विविध अंतरांच्या शर्यती असणार असून, विद्यार्थी, हौशी धावपटू, फिटनेसप्रेमी, व्यावसायिक धावपटू सर्वांसाठी हा उपक्रम खुला आहे. सहभागी स्पर्धकांना आकर्षक रोख पारितोषिके, पदके, प्रमाणपत्रे, तसेच टी-शर्ट आणि नाश्ता देण्यात येणार आहे. मॅरेथॉन शर्यतीच्या या उपक्रमाला जयभारत फाउंडेशन (अशोक आयर्न ग्रुपचा उपक्रम) यांचे पाठबळ लाभले असून ते या मॅरेथॉनचे टायटल स्पॉन्सर आहेत. जयभारत फाउंडेशन समाजउभारणी व सामाजिक जबाबदारीच्या क्षेत्रात सातत्याने मोलाचे योगदान देत आहे.

पहिल्या पर्वाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच यंदा हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात आयोजित करण्यात येत असून यावेळी शहरातील शाळा, महाविद्यालये, रनिंग क्लब्स आणि पर्यावरणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतील, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे. मॅरेथॉन साठी नोंदणी प्रक्रिया सध्या सुरू असून अधिक माहितीसाठी इच्छुकांनी 6360629041 किंवा 9141382211 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



