बेळगाव लाईव्ह:बेळगाव शहरातील चिदंबर नगर परिसरात पहाटेच्या सुमारास एका बंगल्यावर चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना घडली असून, घरमालकाच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला. ही घटना उद्योजक राहुल देशपांडे यांच्या निवासस्थानी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, काल पहाटे सुमारे २.१६ वाजता घराच्या आवारात संशयास्पद हालचालीचा आवाज आल्यानंतर राहुल देशपांडे यांनी बाहेर पाहणी केली असता, मुखवटे घातलेले दोन संशयित कंपाउंडमध्ये घुसल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ आरडाओरडा केल्याने आरोपींनी कंपाउंडची भिंत उडी मारून घटनास्थळावरून पळ काढला.
धक्कादायक बाब म्हणजे, तेच संशयित पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास पुन्हा परत आले, बहुधा घरातील सर्वजण झोपले असतील असा अंदाज घेऊन. मात्र, घरमालक अद्याप जागेच असल्याने हा दुसराही चोरीचा प्रयत्न निष्फळ ठरला आणि संशयितांनी पुन्हा पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच उद्यमबाग पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी नागरिकांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा सल्ला दिला असून, खबरदारी म्हणून परिसरात रात्रीच्या वेळी दोन पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

हा परिसर तिसऱ्या रेल्वे गेटजवळ असल्याने, रेल्वेच्या हॉर्नचा आवाज आड करून चोरटे गैरप्रकार करत असावेत, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, ही घटना परिसरातील नागरिकांसाठी इशाराच असून, विशेषतः रात्री व पहाटेच्या वेळेत नागरिकांनी अधिक सतर्क राहावे, कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




