बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक ठिकाणी अवैधपणे मद्यपान करणाऱ्या एका व्यक्तीला कॅम्प पोलिसांनी रंगेहाथ पकडून अटक केली आहे. शहरात सार्वजनिक शांतता राखण्यासाठी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, ४ जानेवारी रोजी कॅम्प पोलीस ठाण्याचे एएसआय एस. बी. पाटील आणि त्यांचे पथक गस्तीवर होते. यावेळी बेळगाव येथील आयनॉक्स टॉकीज जवळ सार्वजनिक ठिकाणी एक व्यक्ती कायद्याचे उल्लंघन करून मद्यपान करत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित आरोपीला ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव राहुल लक्ष्मण पवार (वय २७, रा. कामत गल्ली, बेळगाव) असे आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे गुन्हा असल्याचे माहित असूनही तो या कृत्यात सहभागी होता. याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०१/२०२५ अन्वये कर्नाटक अबकारी कायद्याच्या कलम १५(ए) आणि ३२(बी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई यशस्वी करणाऱ्या एएसआय आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे बेळगाव शहर पोलीस आयुक्त तसेच पोलीस उपायुक्तांनी (डीसीपी) विशेष कौतुक केले आहे.





