belgaum

बैलहोंगलमध्ये 7 जणांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; बालिका गंभीर जखमी

0
457
dog bite
 belgaum

बेळगाव लाईव्ह :भटक्या कुत्र्यांनी एका दिवशी 7 जणांवर हल्ला केल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल गावातील एम. जे. हाऊसिंग कॉलनीमध्ये घडली असून या हल्ल्यात एक बालिका गंभीर जखमी झाली आहे.

जखमी बालिकेचे नांव सुप्रिया पाटील (वय वर्षे 7, रा. हाउसिंग कॉलनी बैलहोंगल) असे आहे. सुप्रिया ही किराणा सामान आणण्यासाठी आपल्या घराजवळच्या दुकानात जाऊन परत येत असताना तिच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात कुत्र्यांनी हात, पाय, डोक्यासह सर्वांगाला चावा घेतल्यामुळे सुप्रिया गंभीर जखमी झाली आहे.

जखमी सुप्रिया हिला तिच्या कुटुंबीयांनी प्रारंभी स्थानिक खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. तथापि त्या ठिकाणी प्राथमिक उपचारानंतर तिला अधिक उपचारासाठी बेळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भटक्या कुत्र्यांच्या या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

तसेच भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत असताना त्यांचा बंदोबस्त करण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. सध्या बैलहोंगल पोलीस ठाण्याच्या व्याप्तीतील एम. जे. हाऊसिंग कॉलनी परिसरासह के. सी. नगर, इंदिरानगर वगैरे विविध भागांमध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून त्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.

dog bite

घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त करत नगरपालिका प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे. भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत असतानाही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे.

दरम्यान, आरोग्य विभागाने जखमींना रेबीज प्रतिबंधक लसीकरण देण्याची प्रक्रिया सुरू केली असून, नगरपालिका प्रशासनाने परिसरात कुत्र्यांच्या पकड मोहिमेचे आश्वासन दिले आहे.नागरिकांनी विशेषतः लहान मुलांची काळजी घ्यावी आणि भटक्या कुत्र्यांच्या झुंडी दिसल्यास तात्काळ प्रशासनाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.