बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर आणि परिसरातील गवळी समाजाच्या विविध समस्यांबाबत शेतकरी नेते तथा श्रीराम सेना प्रमुख रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली गवळी बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले.
टिळकवाडी, शहापूर आणि अनगोळ परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जनावरांच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी यावेळी करण्यात आली. गवळी समाज शेकडो वर्षांपासून जक्केरीहोंड तलावाचा वापर जनावरांच्या सोयीसाठी करत आहे.
मात्र, काही राजकीय शक्ती यामध्ये जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करत असून समाज बांधवांवर अन्याय केला जात आहे. यापूर्वी महानगरपालिका आयुक्तांनी सुविधा देण्याचे आश्वासन देऊनही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही, त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष घालून तातडीने तोडगा काढावा अशी मागणी गवळी समाज बांधवांच्या वतीने रमाकांत कोंडुस्कर यांनी केली.

स्थानिक नगरसेवकांनी नागरिकांना भडकवून गवळी बांधवांविरोधात पोलिसात तक्रारी केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. शेकडो वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा टिकवण्यासाठी आणि प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी देखील करण्यात आली.
यावेळी गवळी समाज बांधवांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले असून जिल्हाधिकाऱ्यांनी समस्येवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.





