बेळगाव लाईव्ह | बेळगाव किल्ला तलाव येथे भगवान गौतम बुद्धांची 100 फूट उंच मूर्ती आणि केएलईजवळ राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या चौकात छत्रपती श्री शाहू महाराज यांची मूर्ती उभारण्याचा ठराव होऊन दहा वर्षे उलटली तरी त्याची अंमलबजावणी न झाल्याच्या निषेधार्थ कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीच्या वतीने आज बेळगाव महापालिका कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात दलित संघर्ष समितीच्या (भीमवादी) कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर रस्त्यावर ठिय्या मांडत जोरदार घोषणाबाजी केली. महापालिकेच्या निष्क्रियतेचा निषेध करत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
आंदोलनाची माहिती मिळताच महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, बेळगाव उत्तरचे आमदार असिफ राजू सेठ तसेच महापालिका आयुक्त यांनी स्वतः रस्त्यावर बसून आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी दलित संघर्ष समितीच्या नेत्यांनी सांगितले की, 2016 साली तत्कालीन आमदार संभाजी पाटील आणि तत्कालीन जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या उपस्थितीत बेळगाव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते ठराव संमत करण्यात आला होता. या ठरावानुसार किल्ला तलावाच्या मध्यभागी भगवान गौतम बुद्धांची 100 फूट उंच मूर्ती आणि केएलईजवळील चौकात छत्रपती श्री शाहू महाराज यांची मूर्ती उभारायची होती. मात्र दहा वर्षांनंतरही त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

दलित संघर्ष समितीच्या नेत्यांनी आजच्या सर्वसाधारण सभेत या विषयावर चर्चा करून तात्काळ निर्णय घेण्याची मागणी केली. तसेच प्रांताधिकाऱ्यांनी स्वतः येऊन निवेदन स्वीकारावे, अशी भूमिका मांडत मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही दिला.
26 जानेवारीला तीव्र आंदोलनाचा इशारा
प्रसारमाध्यमांशी बोलताना कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीचे भीमवादी विभागीय संचालक रवी बस्तवाडकर यांनी सांगितले की, “महापालिकेने ठराव केला असून त्यासाठी निधीही राखीव आहे. तरीही प्रशासन जाणीवपूर्वक बेजबाबदारपणा दाखवत आहे. गेल्या दहा वर्षांत भगवान गौतम बुद्ध आणि छत्रपती श्री शाहू महाराज यांचा अपमान केला जात आहे.”
“जर आजच्या सर्वसाधारण सभेत निर्णय झाला नाही आणि प्रांताधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारले नाही, तर 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी महापालिकेत ध्वजारोहण होऊ दिले जाणार नाही. काळे झेंडे दाखवून तीव्र आंदोलन करण्यात येईल. यासाठी कोणतीही कारवाई झाली तरी आम्ही मागे हटणार नाही,” असा ठाम इशारा रवी बस्तवाडकर यांनी दिला.





