बेळगाव लाईव्ह :आझाद नगर येथे रविवारी दोन वर्षीय बालकावर भटक्या कुत्र्यांच्या कळपाने प्राणघातक हल्ला झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून जिल्हा प्रशासनानंतर आता बेळगाव महापालिकाही सतर्क झाली आहे. याच पार्श्वभूमीवर नगरसेवक व महापालिका अधिकाऱ्यांनी हिरेबागेवाडी येथील श्वान नसबंदी केंद्रास भेट देत पाहणी केली.
बेळगाव जिल्ह्यात सध्या सुमारे २२ हजार भटकी कुत्री असल्याचा अंदाज असून त्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेकडून हिरेबागेवाडी जवळ श्वान नसबंदी केंद्रासाठी शेड उभारण्यात आले असून, त्या ठिकाणच्या सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
या पाहणीदरम्यान महापौर मंगेश पवार, उपमहापौर, महापालिका आयुक्त, अभियंते तसेच सत्ताधारी व विरोधी पक्षातील नगरसेवक उपस्थित होते. श्वान नसबंदी प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, साधनसामग्री आणि वेळापत्रक याबाबत चर्चा करण्यात आली.

भटक्या कुत्र्यांमुळे होणाऱ्या घटनांना आळा घालण्यासाठी नसबंदी मोहीम गतीने राबवण्याचे निर्देश यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आले. नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत पुढील काळात ठोस उपाययोजना राबवण्याचा निर्धार महापालिकेने व्यक्त केला आहे.
तत्पूर्वी बेळगाव महापालिकेचे महापौर मंगेश पवार महापालिका आयुक्त अभियंते यांच्यासह नगरसेवक, मुजम्मील डोणी साळुंखे उर्दू नगरसेवक यांनी खाजगी इस्पितळाला भेट देत जखमी झालेल्या त्या बालकाच्या पालकांची भेट घेतली.




