बेळगाव लाईव्ह : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिला लग्नासाठी धमकावणाऱ्या नराधमाला बेळगावच्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र विशेष जलदगती न्यायालयाने ५ वर्षांची सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सचिन विरूपाक्ष वाणी (वय ३०, रा. वाणी मळा, केस्ती, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
ही घटना ९ जुलै २०२२ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली होती. पीडित मुलगी अल्पवयीन आहे हे माहित असूनही, आरोपी सचिन याने तिचा पाठलाग करून तिला गाठले. तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने पीडितेचा विनयभंग केला. तिने प्रतिकार केला असता, तिच्याशी गैरवर्तन करत अश्लील शिवीगाळ केली. याप्रकरणी संकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
संकेश्वर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक जी. बी. कोंगनोळी यांनी या प्रकरणाचा तपास करून बेळगावच्या विशेष जलदगती न्यायालयासमोर दोषारोपपत्र सादर केले होते. या खटल्याची सुनावणी न्यायाधीश श्रीमती सी. एम. पुष्पलता यांच्यासमोर झाली. न्यायालयाने ५ साक्षीदार आणि १९ दस्तऐवजांच्या आधारे आरोपी सचिन वाणी याच्यावरील आरोप सिद्ध झाल्याचा निकाल दिला.
न्यायालयाने आरोपीला ५ वर्षांची सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त ६ महिने कारावास भोगावा लागेल, असेही स्पष्ट केले.
तसेच, पीडित मुलीला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून १ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले असून, ही रक्कम ५ वर्षांसाठी राष्ट्रीयीकृत बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील एल. व्ही. पाटील यांनी प्रभावीपणे युक्तिवाद केला.




