बेळगाव लाईव्ह : केंद्र सरकारने मनरेगा योजनेतून महात्मा गांधींचे नाव हटवून देशातील गरिबांना दिवाळखोरीत ढकलण्याचे काम सुरू केले आहे. हा निर्णय म्हणजे गांधीजींची दुसऱ्यांदा हत्या करण्यासारखेच आहे, असा खळबळजनक आरोप एआयसीसी प्रभारी गोपीनाथ पलनिअप्पन यांनी केला. या जनविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी उद्या, ११ जानेवारी रोजी कर्नाटकच्या सर्व जिल्ह्यांमध्ये काँग्रेसतर्फे एकदिवसीय उपोषण करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
बेळगावच्या काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत पलनिअप्पन बोलत होते. ते म्हणाले की, कोणत्याही केंद्रीय योजनेत राज्यांचा ६० टक्के वाटा असतो, मात्र नामांतराचा निर्णय घेताना केंद्र सरकारने कोणत्याही राज्य सरकारला विश्वासात घेतले नाही.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे नाव बदलून व्ही.बी. रामजी असे करणे हे ग्रामीण मजुरांच्या जीवनाशी खेळण्यासारखे आहे. केवळ जाती आणि धर्माच्या नावावर देश विभागण्याचे षडयंत्र भाजप रचत असून, या योजनेचे नियंत्रण थेट दिल्लीच्या हातात घेऊन ग्रामीण अर्थव्यवस्था खिळखिळी केली जात आहे.

या निर्णयाच्या विरोधात काँग्रेसने आंदोलनाची मोठी रूपरेषा तयार केली आहे. ११ जानेवारीच्या उपोषणानंतर, ३० जानेवारीपासून तीन जिल्ह्यांमध्ये लढा तीव्र केला जाईल. तसेच ७ ते १६ फेब्रुवारी दरम्यान भाजप कार्यालयांना घेराव घालण्यात येईल. १६ ते २५ फेब्रुवारी दरम्यान ‘मनरेगा वाचवा’ रॅलीचे आयोजन करून केंद्र सरकारच्या धोरणांचा पर्दाफाश केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, आमदार आसिफ सेठ, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, काडा अध्यक्ष युवराज कदम, सुनील हनुमण्णवर, मृणाल हेब्बाळकर, राजा सलीम आणि इतर काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.





