बेळगाव लाईव्ह|
बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील मरकुंबी येथील साखर कारखान्यात झालेल्या भीषण बॉयलर स्फोटात चार कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सहा कामगार गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना अत्यंत धक्कादायक व निषेधार्ह असून, यास कारखाना प्रशासनाची बेफिकिरी व निष्काळजीपणाच थेट कारणीभूत असल्याचा आरोप ऑल इंडिया युनायटेड ट्रेड युनियन सेंटर (AIUTUC) कर्नाटक राज्य समितीने केला आहे.
या संदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी करून AIUTUCने सदर दुर्घटनेची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. कामगारांच्या सुरक्षिततेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून नफ्याला प्राधान्य दिल्यामुळेच निष्पाप कामगारांचा बळी गेला असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
AIUTUCने मृत कामगारांच्या कुटुंबांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची नुकसानभरपाई तातडीने जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. तसेच मृतांच्या कुटुंबातील एका सदस्याला कायमस्वरूपी नोकरी द्यावी. गंभीर जखमी कामगारांना अत्याधुनिक वैद्यकीय उपचार देऊन पूर्ण वेतनासह रजा मंजूर करावी, असेही संघटनेने नमूद केले आहे.
कारखान्यातील सुरक्षा उपाययोजनांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्याने कारखान्याच्या मालकांविरोधात तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी AIUTUCने केली आहे. यासोबतच कारखान्याला सुरक्षा प्रमाणपत्र देणाऱ्या संबंधित सरकारी अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात यावी, असे संघटनेने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, राज्यातील सर्व साखर कारखान्यांमध्ये तातडीने ‘सुरक्षा ऑडिट’ राबवावे. कामगारांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या कारखान्यांचे परवाने त्वरित निलंबित करावेत, अशी ठाम भूमिका AIUTUC कर्नाटक राज्य समितीने घेतली आहे.
ही माहिती AIUTUCचे कर्नाटक राज्य सचिव के. सोमशेखर यादवगिरी यांनी दिली आहे.





